पुत्र इत्यादिकांनी पिता, माता, इत्यादिकांस उद्देशून केलेल्या श्राद्धातील नाम, गोत्र व मंत्र हे ते अन्न त्या त्या पितरांस नेऊन देतात. पिता इत्यादि देवरूप असतील तर ते अन्न अमृतरूप होऊन त्या स्थानी त्यास मिळते. गंधर्वरूप असता भोग्यरूपाने, पशुरूपी असता तृणरूपाने, सर्परूपी असता वायुरूपाने, यक्षरूपी असता पानरूपाने, दानवरूपी असता मांसरूपाने, प्रेतरूपी असता रुधिर रूपाने, मनुष्यरूपी असता अन्नादि रूपाने, याप्रमाणे त्या त्या स्वरूपाने त्या त्या स्थानी प्राप्त होते. दुसर्या ग्रंथात असे सांगितले आहे की, श्राद्धकर्त्याचे पितर श्राद्धकाळ आला असे श्रवन करून परस्परांचे मनामध्ये ध्यान करून मनोवेगाने प्राप्त होतात व नंतर वायुरूपी ते पितर श्राद्धाला आमंत्रण केलेल्या ब्राह्मणांसहवर्तमान भोजन करितात. म्हणूनच श्रीरामाने श्राद्ध केले तेव्हा सीतेने ब्राह्मणांच्या ठायी दशरथादिक पितर पाहिले अशी कथा ऐकण्यात आहे. वर्षाऋतु संपल्यावर यम प्रेतपितरांस यमालयापासून आपले नगर शून्य करून भूलोकी पाठवितो तेव्हा ते पितर पुत्रादिकांपासून मधुयुक्त पायस प्राप्त व्हावे; अशी इच्छा करितात. सूर्य कन्या राशीस आला म्हणजे पितर पुत्राकडे येतात; अमावास्येचा दिवस आला म्हणजे गृहाचे द्वाराचा आश्रय करून श्राद्धप्रतीक्षा करीत राहतात. पुत्रादिकांनी श्राद्ध न केले तर त्यास शाप देऊन ते आपापल्या मंदिरास जातात म्हणून मुले, फले किंवा उदकतर्पण याने पितरांची तृप्ति करावी. श्राद्ध करावयास चुकू नये. शिवाय श्राद्धाने ब्रह्मादि स्तंबपर्यंत सकल भुतांची तृप्ति होते, असे श्रुत आहे. त्यात पिश्चाच्चादिरूप पितरांची तृप्ति विकिरादिकांनी होते. वृक्षादिकरूप असणारांची तृप्ति स्नानानंतर वस्त्रनिष्पीडनोदकाने होते. कित्येकांची तृप्ति उच्छिष्ट पिंडादिकाने होते. म्हणून ब्रह्मीभूत पितृकानेही श्राद्ध करावे. त्यात पितृपितामह प्रपितामहादिरूप असे एकेक पार्वण, वसुरुद्र, आदित्य इत्यादि भेदांनी ध्यान करण्यास योग्य आहे. एकोद्दिष्ट गणाचे ध्यान वसुरूपाने करावे. याप्रमाणे सर्वत्र जाणावे. कित्येक ग्रंथकार असे म्हणतात की, पितापितामह व प्रपितामह यांचे ध्यान क्रमाने प्रद्युम्न, संकर्षण व वासुदेव या रूपाने करावे. कर्ता अनिरुद्धरूपी आहे असे ते म्हणतात. याचप्रमाणे कित्येक ग्रंथात यांचे ध्यान वरुण, प्रजापति व अग्नि यांच्या रूपाने करावे, असे म्हटले आहे. तर काही ग्रंथात मास, ऋतु व वत्सर या रूपांनी त्यांचे ध्यान करावे, असे म्हणतात. त्यात जसा आचार असेल त्याप्रमाणे समुच्चयाने किंवा विकल्पाने ध्यान करावे. याप्रमाणे व्यवस्था जाणावी. पिता इत्यादिक पार्वण जेथे आहे तेथे मातामहादि पार्वणाचा उद्देश करावा. अब्दिक व मासिक श्राद्धात मातामहादिकांचा उद्देश करू नये. मासिक श्राद्धे व अब्दिक श्राद्धे यात तीन देवता उक्त आहेत. वृद्धि (नांदी) श्राद्ध, तीर्थश्राद्ध, अन्वष्टकाश्राद्ध, गयाश्राद्ध व महालय या श्राद्धात तीन पार्वणे इष्ट आहेत. इतर श्राद्ध पौरुष असे सांगतात. सपत्नीक पित्रादि त्रयी व सपत्नीक मातामहादि त्रयी यांचे नाव षाट् पौरुष क्षयदिवस वर्ज करून स्त्रियांचे पृथक श्राद्ध नाही. अन्वष्टकाश्राद्ध, वृद्धिश्राद्ध, गयाश्राद्ध व क्षयदिवस या श्राद्धी मातेचे निराळे श्राद्ध करावे. इतर स्थळी पतिसहवर्तमान करावे.