नंतर प्राचीनावीति करून आद्यंती उदक देऊन गंधादि उपचारांनी पूजा करावी. ती अशी 'अमुकशर्मन् यथानामगोत्रायन् ते गंधः स्वधानमः' असे एक ब्राह्मण असेल तर; शर्माणो यंवोगंधः' इत्यादि प्रकारांनी तीन वेळ गंध द्यावे. शेषकर्म पुर्वीप्रमाणे करावे. 'अमीतेगंधाः' असा बहुवचनान्त उच्चार गंध देताना करावा. असे काही ग्रंथकार म्हणतात. अर्घ्यदानाशिवाय सर्वत्र 'स्वधानमः' असा शेवटी उच्चार करून उपचार द्यावे; येथे पितरांकडील ब्राह्मणाच्या पूजेमध्ये गंधादिक उपचार पदार्थानुसमयाने किंवा कांडानुसमयाने द्यावे. संपूर्ण वाचनादिक पूर्वीप्रमाणे करून चतुष्कोन, वर्तुळ यथाक्रमाने उदकाने, किंवा गोमय, भस्म, इत्यादिकाने सव्यापसव्याने मंडल करावी. नैऋत्य दिशेस आरंभ करून ईशानीपर्यंत देवाकडे व ईशानीपासून नैऋतीपर्यंत पितरांकडे प्रदक्षिण व अप्रदक्षिण मंडले करून त्यावर पुर्वी सांगितलेली पात्रे मांडावी. लोखंडाचि व पितळेची पात्र कधीही प्रशस्त नाहीत. शिशाची व कथलाची पात्रे ही प्रशस्त नाहीत. कास्यपात्र विकल्पित आहे. पानाच्या पात्रात पळस, मोह, उंबर, कुडा, पिंपरी या वृक्षांची पाने प्रशस्त होत. कदली, आंबा, फणस, जांभूळ, व चाफा या वृक्षांची पाने मध्यम होत. याप्रमाणे पात्र मांडून पितृपुर्वक पात्राच्या सभोवार भस्ममर्यादा (पिशंगी) व पितृपूर्वक ब्राह्मणांची करशुद्धि सव्यापसव्यांनी करावी. पिशंगीसमयी पिशंग व रक्षाणो हे दोन मंत्र कोणी म्हणतात. आचमन करुन करशुद्धीचे उदक पादप्रक्षालनाचे मंडलावर टाकावे.