जातकर्मादि संस्कारांनी संस्कृत असून, सत्यवक्ता, शुचिर्भूत, वेदाध्ययनांनी युक्त, अध्ययन, अध्यापन, यजनयाजन, दान व प्रतिग्रह ही षटकर्मै करणारा व पिता इत्यादि तीन पुरुष ज्याचे विख्यात आहेत असा जो तो ब्राह्मण होय. याप्रमाणे ब्राह्मणाचे सामान्य लक्षण सांगितले. त्यात उत्तम, मध्यम व अधम या भेदाने ब्राह्मणाचे तीन प्रकार आहेत.
त्यापैकी उत्तम ब्राह्मण - वेदाध्ययनांनी युक्त, वेदांगांचे अध्ययन करणारे, वैय्याकरण, मीमांसाशास्त्राचे अध्ययन करणारे, पौराणिक, वेदांती, धर्मशास्त्ररत हे व यांचे पुत्र, ब्रह्मवेत्ता, वेदार्थ जाणणारा,कर्मनिष्ठ, तपोनिष्ठ, योगी, पिता माता यांची सेवा करणारा, स्वधर्मसक्त, वयाने लहान, पण अग्निहोत्री, सोमादि श्रौत कर्म जाणणारा, शिवभक्त, विष्णुभक्त, स्वस्त्रियेप्रत ऋतुकाळी गमन करणारा, गुरुभक्त, ज्ञाननिष्ठ सोमयाग करणारा, सत्यवक्ता, सुशील, स्नातक, संन्यासी व ब्रह्मचारी हे सर्व उत्तम होत. हे सर्व सपत्नीक व तारुण्यादि गुणांनी युक्त असून सापिंड्य संबंध, योनिसंबंध व शिष्यत्वादि संबंध यांनी विरहित; व कुष्ठ, अपस्मार इतादि दोषांनी रहित असे असत्ल तर ते उत्तम होत. दशाहादिक जे सूतक (जननाशोच व मृताशौच) यास कारण असा जो सापिंद्य, सगोत्र,सोदकत्वरू संबंध तो सापिंड्य संबंध जाणावा, मातुलत्व, श्वशुरत्व व शालकत्व इत्यादि रूप जो संबंध तो योनिसंबंध; आदिशब्दावरून गुरुत्व, साहाध्यायित्व व मित्रत्व इतादि संबंध ग्रहण करावे. याप्रमाणे विचार केला असता सपत्नीकत्वादि गुणयुक्त असून पूर्वोक्त संबंधविरहित, अपस्मार व अंधत्व इत्यादि दोषरहित, वेदाध्ययनाने युक्त इत्यादि सत्तावीस प्रकारचे ब्राह्मण उत्तम होत, असे सिद्ध झाले. त्यात विशेष जर एक ब्राह्मण श्राद्धास सांगणे असेल तर तो छेदांग (अथर्वणवेदी) सांगावा. कारण छंदोग ब्राह्मणाचे ठायी ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद असे तीन वेद राहातात. श्राद्धकर्मात भोजनाला ब्राह्मण सांगावयाचे ते; ऋग्वेदी, यास पितृस्थानी, यजुर्वेदी यास पितामहस्थानी; सामवेदीयास प्रपितामहस्थानी व अथर्वणवेदी विश्वेदेव व पितर या स्थानी सांगावे. यावरून स्वशाखीय द्विजांचा अभाव असता अन्यशाखीयांस निमंत्रण करावे असे जे मत त्याचे खंडन झाले. कोणी ग्रंथकार असे म्हणतात की, 'जशी कन्या तसे हवि' हा नियम असल्यामुळे ज्यांच्या बरोबर योनिसंबंध घडतो तेच परशाखीय श्राद्धास योग्य होत; पण हे म्हणणे निर्मूल आहे. काही ग्रंथकार म्हणतात की, श्राद्धकर्त्याचे सगोत्री व सप्रवर्य वर्ज करावेत; कारण पिता व पुत्र, दोन भ्राते, निरग्निक, गर्भिणी पति, सगोत्री, सप्रवरी हे श्राद्ध कर्मास वर्ज करावेत, असे वचन आहे. श्राद्धाचे ठायी संन्याशाने भोजन केले असता मांसावाचून, मधुवाचून, दक्षिणेवाचून व आशिर्वादावाचून श्राद्ध परिपूर्ण होते, अशी संन्यासाची प्रशंसा जाणावी.