विहित पदार्थ सांगितल्याने तद्भिन्न पदार्थ अग्राह्य होत, असे सिद्ध होत असले तरी विशेष दोष दाखविण्यासाठी व अप्राप्य पदार्थांचा निषेध जाणविण्यासाठी ते सांगतो. लांच इत्यादिकांपासून मिळालेले, पतित व अंत्यज इत्यादिकांपासून मिळालेले, अनीतीने संपादन केलेले, कन्याविक्रयापासून मिळालेले द्रव्य निंद्य होय. पितृकर्मासाठी 'मला दे' अशी याचना करून मिळविलेले द्रव्यही निषिद्ध होय. तूर, कुळिथ, मसूर, कोद्रू, काळे शिरस, हे निषिद्ध होत. लाख, म्हणून प्रसिद्ध हे मर्कटक तेही वर्ज होय. शेवगा, कूष्मांड, दोन प्रकारचे भोपळे, करवंदे, ओली मिरे, वाटोळा मुळा, करडई, करटोली, वेळूचे कोंब, १० प्रकारचे लसूण, इत्याइ पलांडूचे भेद, कृतीची लवणे, तांबडे बेलफळ, पांढरे व काळे वांगे, गाजर, भोकर, वस्तुवर्ण, चीक हे पदार्थ वर्ज होत. सामुद्र व सैंधव ही लवणे प्रत्यक्ष भक्षण करावीत. मांजराने हुंगलेला पदार्थ श्राद्धामध्ये वर्ज करावा असे बुधांनी सांगितले आहे. करीर (कण्हेर) वृक्षाची फले व पुष्पे, वावडिंग व मिरे, महाळुंग व पटोल (पडवळ) ही श्राद्धात दिली असता अधोयोनी प्राप्त होते. श्राद्धांत सर्व काळी धान्ये वर्ज करावी. पण तीळ, मूग व उडिद ही वर्ज करू नयेत. दात्यास प्रिय असलेला पदार्थ निंद्य नसेल तर त्यास द्यावा. तो हितकारक होतो. शेळी, मेंढी व म्हैस यांचे दूध व त्यांचे दही, इत्यादि पदार्थ वर्ज करावेत. वाळू, कीटक व खडे, रेव, केस यांनी दूषित झालेले व वारा घातलेले अन्न श्राद्धात वर्ज करावे. अशुद्ध प्राण्यांनी स्पर्शिलेले शुष्क, शिळे, द्विपक्व, दग्धान्न व पूर्वी तयार करून ठेवलेले पदार्थ, हे सर्व वर्ज करावेत. एकवेळ शिजविल्याने भक्षण करण्यास योग्य असताही हिंग, जिरे इत्यादिकांचा संस्कार करण्याकरिता जे अन्न पुनः शिजविले जाते ते दोनदा शिजविलेले अन्न वर्ज होय. दोन वेळ शिजविल्यानेच खाण्यास योग्य होणारे अन्न निषिद्ध नाही, असे निर्णयसिंधुत सांगितले आहे. ज्या अन्नाचा एकदेश एखाद्या प्राण्याने हुंगिला ते अन्न श्राद्धात वर्ज करावे. मारीष म्हणजे राजगिरा या नावाने प्रसिद्ध असलेली शाक व धान्य वर्ज होय. वड, पिंपरी, उंबर, कवठ, नीप (कळंब) व महाळुंग यांची फळे भक्षण करू नयेत. लवणयुक्त दूध व तांब्याच्या भांड्यातील गाईचे दूध ही सुरेसमान होत. यास अपवाद अनुधृत सार, दूध व पयोयुक्त दही आणि घृत ही तांब्याच्या पात्रात असली तरी निषिद्ध नाहीत. पिंपळी वा वाटोळी मिरी यांचा प्रत्यक्ष निषध आहे. दुसरे द्रव्य मिश्रित केले त्याचा दोष नाही. नारळ विहित व प्रतिषिद्ध आहे. पौतिक, शाक इत्यादिक, शिळे ताक, संधिनी म्हणजे बैलाने मैथुनात आकृमिलेली गाय इत्यादिकांचे दूध, प्रसूत होऊन दहा दिवस न झालेल्या गाईचे दूध, हरिणी इत्यादिकांचे दूध, फेसयुक्त तक्रादिक, हातावर दिलेले स्नेहद्रव्य व लवण इत्याद्क पदार्थ जे नित्य भोजनात निषिद्ध आहेत, ते सर्व श्राद्धातही वर्ज करावेत. मृत झालेल्या मक्षिका कीटक इत्यादि प्राणी व केस, रोम, नखे इत्यादिकांनी दूषित झालेले अन्न संभव असता वर्ज करावे. संभव नसल्यास केशादि काढून प्रोक्षण करून हिरण्याचा स्पर्श करून भक्षण करावे. कुत्रा, मांजर, उंदीर इत्यादिकांनी चाटलेले अन्न असेल तर ते आपत्तीतही वर्ज करावे, असे माधवाच्या ग्रंथात सांगितले आहे. मांडे, वडे, सातुचे पीठ, पायस, अपूप, कृसर इत्यादिक तेलात सिद्ध केलेले पदार्थ शिळे असले तरी त्यास दोष नाही, असे जे वचन आहे ते नित्य भोजनपर आहे, श्राद्धपर नाही असे शिष्ट सांगतात. अग्नीने पक्व झाले असून त्यावर एक दोन इत्यादि रात्री गेल्या असता ते अन्न पर्युषित (शिळे) म्हणतात.