दक्षिण दिशेस उतरती, गोमयानें सारवलेली, कीटक, अस्थि, केश, श्लेष्मा इत्यादिकांनीं वर्जित, कृत्रिम भूमि वर्जित व रजस्वला दर्शनादिकानें वर्जित, अशा भूमीचे ठिकाणीं श्राद्ध करावें. कुरुक्षेत्र, प्रभास, पुष्कर, प्रयाग, काशी, गंगा, यमुना, नर्मदा, इत्यादिकांचें तीर, नैमिषारण्य, गंगाद्वार, गयाशीर्ष व अक्षय्यवट इत्यादि स्थानीं श्राद्ध केलें असतां महाफल प्राप्त होतें. गयाशिरावर, शमीपत्रप्रमाण पिंड दिला असतां सातगोत्रें व १०१ कुलें यांचा उद्धार होतो. "पिता, माता, भार्या, भगिनी, कन्या, पितृष्वसा व मातृष्वसा हीं सात गोत्रें जाणावीं. "यांचीं गोत्रें म्हणजे क्रमानें २४-२०-१६-१२-११-१० व ८ याप्रमाणें १०१ पुरुष त्यांचा उद्धार होतो. त्यांत पितृकुलांतील मागचे बारा व पुढचे बारा मिळून २४ पुरुष. मातृकुलांतील मागचे १० व पुढचे १० मिळून २०, याप्रमाणें पुढेंही जाणावें. "तुलसीचे अरण्याची छाया, शालिग्रामाचें सान्निध्य व चक्रांकिताचें सान्निध्य या ठिकाणीं मनुष्यें जें स्नानदान, तप व श्राद्ध करतील तें अक्षय्य होतें. गाय, हस्ती व अश्व यांनीं दोषित झालेल्या प्रदेशांत व म्लेंच्छ देशांत श्राद्ध करुं नये. परकीय घर इत्यादि स्थानीं श्राद्ध केल्यास त्या भूमीच्या स्वामीचे पितर त्या श्राद्धाचा भार हरण करितात. म्हणून त्या घराच्या मालकास मूल्य (भाडें) देऊन अथवा त्याची परवानगी घेऊन श्राद्ध करावें. वनें, पर्वत, नदीचें तीर, देवालयें, देवखात व गर्त यांचेवर कोणाचेंही स्वत्व नाहीं. एक वस्त्र धारण करुन अशुचि असतां कोठेंही व द्वीप, अंतरिक्ष अशा स्थळीं श्रुतिस्मृतिविहित कर्म कधींही करुं नये.