आता निमंत्रणापासून श्राद्ध दिवशी भक्षिलेल्या अन्नाचा परिपाक होईपर्यंत श्राद्धकार्याचे व ब्राह्मणांचे नियम सांगतो - स्त्रीसंग, पुनः भोजन, अनृत भाषण, अध्यापन, द्यूत, आयास, भार वाहणे, हिंसा, दान, प्रतिग्रह, चोरी करणे, मार्ग चालणे, दिवसा निद्रा व कलह वर्ज करणे हे कर्त्याचे व भोक्त्याचे धर्म होत. श्राद्धदिवसाच्या पूर्वी व श्राद्धदिवशी ऋतुकालीही स्त्रीसंग वर्ज करावा. तांबूल, श्मश्रुकर्म, अभ्यंग, दंतधावन ही वर्ज करणे हे श्राद्धकर्त्याचे धर्म होत. श्राद्धभोक्त्या ब्राह्मणास उद्वर्तन, श्मश्रूकर्म, अभ्यंग दंतधावन ही वर्ज करणे हे श्राद्धकर्त्याचे धर्म होत. श्राद्धभोक्त्या ब्राह्मणास उद्वर्तन, श्मश्रूकर्म व तेलाभ्यंग याविषयी विकल्प आहे. कर्ता व भोक्ता यांस उदकस्नानानेच अधिकार येतो; गौण स्नानाने येत नाही. श्राद्धकर्ता शुक्लवस्त्र परिधान केलेला, मौनी व जितेंद्रिय असून त्याने उपोषण, परान्न व औषध वर्ज करावे. अवस्त्रत्व, मलिन वस्त्रत्व, कौपीनत्व, कच्छहीनत्व, अनुत्तरीयत्व, काशायवस्त्रत्व, आर्द्रवस्त्रत्व, द्विगुणवस्त्रत्व, रक्तवस्त्रत्व, दग्धवस्त्रत्व व स्यूत (शिवलेले) वस्त्रत्व, याप्रमाणे ११ प्रकारचे नग्नत्व कर्ता व भोक्ता यांनी वर्ज करावे. ललाटी ऊर्ध्वपुंड्र इत्यादि धारण करण्याविषयी कर्त्यास विकल्प आहे. पण भोक्त्याने ऊर्ध्वपुंड्र धारण करावाच. पिंडदानाच्या पूर्वी कर्त्याने चंदनाचा तिलक लावू नये. भोक्त्यास तो भोजन कालाच्या पूर्वी वर्ज्य आहे. दर्भसहित हस्ताने तिलक लावू नये. लाविल्यास आचमन करून दर्भाचा त्याग करावा. कर्त्याने निमंत्रित ब्राह्मणाचा त्याग करू नये. प्रमादाने त्याग केल्यास मोठ्या प्रयत्नाने त्या ब्राह्मणास प्रसन्न करावे. बुद्धिपुर्वक त्याग केल्यास यतिचांद्रायण प्रायश्चित्त करावे. आमंत्रित ब्राह्मण भोजनास अन्यत्र गेल्यास शंभर नरकाप्रत जाऊन शेवटी चांडालात जन्मास येतो. आमंत्रितद्विज श्राद्धकाली विलंब करील तर तो देवद्रोही व पितृद्रोही होऊन नरकास जातो. कर्ता व भोक्ता यांनी श्राद्धदिवसाच्या पूर्व रात्रीही स्त्रीसंग व पुनर्भोजन करू नये. श्राद्धीभोजन केलेल्या ब्राह्मणाने दहावेळ गायत्री मंत्राने अभिमंत्रित केलेले उदक प्राशन करावे. सायंसंध्या करावी; व जप आणि होमही करावा. सुतक, प्रवास, असामर्थ्य व श्राद्धभजन या प्रसंगी औपासनादिक होम स्वतः करू नये. दुसर्याकडून करवावा. श्राद्धी निमंत्रित असता स्त्री इत्यादिकास ताडन करू नये. अपराण्ह नामक त्रिमुहूर्त काली सर्वांनी वृक्ष तोडू नये व दधिमंथन करू नये. कर्त्यास सामर्थ्य नसल्यामुळे त्याचा पुत्र, शिष्य इत्यादिक जेव्हा प्रतिनिधि होऊन श्राद्ध करितो तेव्हा यजमान व प्रतिनिधि या दोघांनीही पूर्वी सांगितलेले कर्त्याचे सर्व नियम पाळावेत. मुक्तकच्छा व मुक्तकेशी स्त्री फार हसली व बोलली असता पितर निराश होऊन जातात. ब्राह्मणास निमंत्रण करण्यासाठी स्वकीय वर्णातील आप्त असा पाठवावा. ब्राह्मणाचे अन्न वृषलाने निमंत्रित असेल व वृषलाचे अन्न ब्राह्मणाने निमंत्रित असले तरी ते अपूज्य होय. वृषल म्हणजे शूद्र होय.