आता वर्ज्य ब्राह्मण सांगतो - क्षय, दमा, मूत्रकृछ्र, भगंदर इत्यादि महारोगांनी युक्त असलेला हीनांग, अधिकांग, काणा, बहिरा, मुका, शत्रु, कितव (जुवेबाज), वेतन घेऊन अध्याय सांगणारा, मित्रद्रोही, दुर्जन, कुनखी, कृष्णवंत, षंढ, माता, पिता, गुरु यांचा त्याग करणारा, चोर, नास्तिक, पापकर्मी, स्नान संध्यादि विहित कर्मांचा त्याग करणारा, नक्षत्रविद्येवर उपजीविका करणारा, वैद्य राजसेवक, गायक, लेखक, व्याजबट्टा करून उपजीविका करणारा, नट, गृहास अग्नी लावणारा, समुद्रगमन करणारा, शस्त्रे करणारा, सोम विक्रय करणारा, पक्षी पाळणारा, परिवेत्ता, दिधिषूचा पति, कुमाराध्यापक, पुत्रापासून विद्या शिकलेला, द्रव्यप्राप्तीस्तव वेदघोश करणारा, ग्रामोपाध्याय, केश व पशु यांचा विक्रय करणारा, शिल्पकाम करणारा, पित्याशी अतिवाद करणारा, शूद्राकडे यजन करणारा, जटाधारी, श्मश्रुहीन, निर्दय, रजस्वला पति, गर्भिणी पति, कुबडा, खुजा, आरक्तनेत्र वाणिज्यावर उपजीविका करणारा, छिन्नोष्ठ, छिन्नलिंग, गुडुमान, ज्वरित, देवलक, विधुर, निरग्नि, शूद्रगुरु, शूद्रशिष्य, दांभिक, गाई, बैल यांचा विक्रय करणारा, रसाचा विक्रय करणारा, वेदनिंदक, वृक्षांची लावणी करणारा, कृपण, सदा याचना करणारा, शेतकीवर उपजीविका करणारा, साधुनिंदित, मेंढे व महिष पाळणारा, पिंगत केश असणारा, वेदाध्ययन विसरलेला, निष्ठुर भाषण करणारा; इत्यादि ब्राह्मण दैवकर्म व पित्र्यकर्म यांस वर्ज होत. धर्मासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी औषधे करणारा ब्राह्मण निंद्य होय. द्रव्यासाठी सतत तीन वर्षेपर्यंत देवाची पूजा करणारा व देवाचे द्रव्य घेणारा तो देवलक होय. हा सर्व कर्मात वर्ज करावा. हे वचन मनुष्यस्थापित देवताविषयी वाटते. ज्येष्ठ भ्राता, अविवाहित व निरग्निक असता जो कनिष्ठ भ्राता विवाह व अग्निहोत्र धारण करितो तो परिवेत्ता, व ज्येष्ठ परिवित्ती असे जाणावे. ज्येष्ठ भ्रात्याची आज्ञा असल्यास दोष नाही, असे सांगितले आहे. ज्येष्ठ कन्या अविवाहित असून त्या कनिष्ठ कन्येचा विवाह केला ती कनिष्ठ कन्या अग्रयदिधीषु जाणावी व ज्येष्ठ कन्या दिधीषु जाणावी. मूर्तीचा विक्रय करणारा पतित होय व उपजीविकेकरिता परकीयांच्या अस्थि नेणाराही पतित होय. गायन, नृत्य इत्यादिक उपजीविकेसाठी करणे निषिद्ध आहे. भगवप्तीत्यर्थ निषिद्ध नाही.