त्यात आधी दर्भ सांगतो - दर्भग्रहणाचा काल, मंत्र व दर्भाचे भेद द्वितीय परिच्छेदात सांगितले आहेत. येथे विशेष मात्र सांगतो. दर्भात कुश मुख्य असून त्याच्या अभावी काश, दूर्वा, उशीर, तृण इत्यादि घ्यावे. काश अथवा दूर्वा यांचे पवित्रक हातात घालून आचमन करू नये. दोन अनामिकांमध्ये दोन दर्भपवित्रे धारण करावीत किंवा एका अनामिकेच्या ठायी दोन पेराच्या मध्ये पवित्रक धारण करावे. गर्भात अन्यदल नसलेले दोन साग्रकुश घेऊन त्याचे पवित्रक करावे; दोन किंवा चार कुशाचे ग्रंथियुक्त किंवा ग्रंथिविरहित पवित्रक करावे. स्नान, दान, जप, होम, पितृकर्म व ब्रह्मयज्ञ कर्तव्य असता दोन्ही हातात पवित्रके अथवा दर्भ धारण करावे. दर्भाशिवाय कर्म करू नये. शाहण्या पुरुषाने ब्रह्मग्रंथियुक्त पवित्रक हातात घालून आचमन करू नये. ग्रंथियुक्त पवित्रक असेल तर दक्षिण हस्तात दोन साग्र दर्भ व वामहस्तात तीन किंवा दोन दर्भ धारण करावे, असे काही ग्रंथकार म्हणतात. आसनास दोन अर्भ, पित्रकर्माचे ठायी मूलासहित द्विगुण दर्भ घ्यावेत. दैवकर्माचे ठायी साग्र व सरळ दर्भ घ्यावेत. पित्र्यकर्मातही सपिंडीकरण झाल्यावर दोन वेळ मोडलेले असे असावेत. पिंडप्रदान केलेले व पित्रतर्पण केलेले दर्भ मलमुत्रोत्सर्गाच्या वेळी धारण केल्याने अशुद्ध झालेले व मलमुत्रादिकांनी अपवित्र झालेले दर्भ, मार्ग, चिता व यज्ञभूमि व स्थानचे दर्भ, परिस्तरण व आसन व ब्रह्मयज्ञातील दर्भ, हे सर्व दर्भ टाकण्यास योग्य होत. सुवर्ण पवित्रकाच्या सोळाव्या अंशाचे बरोबरीची इतर कुश व दूर्वादिकांची पवित्रके नाहीत. म्हणजे सर्व जातीच्या पवित्रकांपेक्षा सुवर्ण पवित्रक श्रेष्ठ आहे. पांच गुजांचा एक मासा, या मानाने सोळा मासे वजनाचे सुवर्ण पवित्रक असावे, असे म्हणतात.