सव्याने किंवा अपसव्याने देशकालाचा उच्चार करून अपसव्याने त्याच्या श्राद्धास योग्य जे पितर त्यांचा षष्ठी विभक्तीने 'एतेषाममुकश्राद्धं सदैवं सपिंडं पार्वणविधिनैकोद्दिष्टेन वान्नेनामेन वाहिरण्येन वाश्वःसद्योवाकरिष्ये' असा संकल्प जसा संभव असेल त्याप्रमाणे करावा. सर्व ठिकाणी ब्राह्मणांनी कुरुष्व असे यथायोग्य प्रतिवचन अवश्य द्यावे. त्यानंतर दैवधर्माने ब्राह्मणांच्या दक्षिण जानूस स्पर्श करून 'अमुकपितृणाममुक श्राद्धे अमुकविश्वेदेवार्थत्वयाक्षणक्रियतां' असे म्हणून क्षण द्यावा. नंतर ब्राह्मणाने 'ॐ तथा' असे म्हणावे. कर्त्याने 'प्राप्नोतुभवान्' असे व ब्राह्मणाने 'प्राप्नवानि' असे म्हणावे. याप्रमाणे पितृधर्माने वामजानूस स्पर्श करून 'अमुकश्राद्धे अमुकस्यस्थाने त्वयाक्षणः०' इत्यादि पूर्वीप्रमाणे करावे. त्रयीच्या ठिकाणी एक ब्राह्मण असेल तर 'पितापितामह प्रपितामहानांस्थाने' असे म्हणावे. 'अक्रोधनै०' इत्यादि प्रार्थना करावी. येथे सर्व ठिकाणी देवपूर्वक कर्म करावे. क्वचित स्थली पितृपूर्वक कर्म करावे ते पुढे सांगेन. स्कल्प करणे, क्षण देणे, इत्यादि कर्म पूर्वदिवशी किंवा श्राद्धदिवशी करावे. नंतर कुतुपकाली म्हणजे अष्टममुहूर्ती स्नान केलेल्या कर्त्याने स्नात व धौतपाद ब्राह्मण सन्निध बसवावेत. नंतर आचार असल्यामुळे सव्याने तिलोदक व यवोदक करावे. नंतर सव्याने शुद्धीसाठी प्रायःश्चितार्थ सूक्तांचा जप व प्रदक्षणा करावी, व 'समस्त संपत०' या मंत्राने नमस्कार करावा. आचार असल्यामुळे अधिकार वचन अपसव्याने करावे. नंतर आचमन व प्राणायाम सव्याने करून अपसव्याने दुसरा संकल्प करावा. सद्यः करणपक्ष असेल तर दुसरा संकल्प करू नये असे काही ग्रंथाकर म्हणतात. यावर उभे राहून देवांकडे व पितरांकडे सव्यानेच "भवता स्वागतं' असा प्रत्येक ब्राह्मणास प्रश्न करून पूर्वी सांगितल्याप्रमाणे दुसर्याने क्षण द्यावा. याविषयी गृह्याग्नियुक्त बहृच असतील तर यांनी दर्शश्राद्ध, अन्वष्टकाश्राद्ध, पूर्वेदुःश्राद्ध यांचे ठायी पिंडपितृयज्ञाच्या व्यतिषंगाने श्राद्धप्रयोग करावा. इतर शाखीयांनी करू नये व बह्वचांनीही इतर श्राद्धात करू नयेः तो व्यतिषंग प्रयोग असा - दुसर्याने क्षण देणे येथपर्यंत श्राद्धतंत्र करून परिसमूहनापासून इध्मास्थापनापर्यंत पिंडपितृयज्ञाचे तंत्र केल्यावर ब्राह्मणाचे पादप्रक्षालनापासून भस्ममर्यादान्त म्हणजे पिशंगी घालीपर्यंत कर्म करावे. नंतर अग्नीच्या ठायी अग्नौकरण करून परिवेषनापासून संपन्न वचनापर्यंत कर्म झाल्यावर पिंडदानापासून पात्रचालनापर्यंत कर्म करावे, व विकिरादिक श्राद्धशेष समाप्त करावे. अशा स्वरूपाचा व्यतिषंग प्रयोग जाणावा. याप्रमाणे हिरण्यकेशीय इत्यादिकांचा पहिला संकल्प केल्यावर अग्नीचे स्थापन, अन्वाधान, इत्यादिक आज्यसंस्कारान्त कर्म करून पाद्यादिक पूजा व त्यावर त्या त्या मंत्रांनी युक्त असा सविस्तर अग्नौकरण होम जाणावा.