येथे ग्राह्य ब्राह्मणाविषयी जे सांगितले त्याहून भिन्न ते वर्ज्य सिद्ध असता पुनः वर्ज्य ब्राह्मणांची जी परिगणना सांगितली ती अशासाठी की, वर्ज्याहून भिन्न (निराळे) निर्गुण असले तरी ते ग्राह्य होत. विद्या, आचरण इत्यादि गुणांनी युक्त असता कुष्ठित्व, काणत्व इत्यादि शरीरदोष दूषणकारक नाही. गयेस तर निर्गुण असले तरी गयेचेच ब्राह्मण श्राद्धी भोजनास सांगावे. कुलशील, विद्या व तप यांचा विचार करू नये. त्यांची पूजा न केल्याने पितर व गुह्यक यासहवर्तमान देव संतुष्ट होतात, असे वचन आहे. म्हणून तीर्थाचे ठायी व क्षेत्रात राहाणार्या ब्राह्मणाची परीक्षा करू नये. धर्मवेत्त्या पुरुषाने दैवकर्माचे ठायी ब्राह्मणाची परीक्षा करू नये. पित्र्यकर्म प्राप्त झाले असता प्रयत्नाने परीक्षा करावी, असे जे वचन आहे ते असंभवपरच आहे. आचारसंपन्न असून केवळ गायत्री मात्र जाणणारा असला तरी उत्तम होय व आचारसंपन्न नसून सर्व खाणारा व सर्व पदार्थ विकणारा असा जरी चार वेद जाणणारा असला तरी तो निंद्य जाणावा, असे हेमाद्रीत व्यासाचे वचन आहे. वेदपारग ब्राह्मणांनी मिश्र असे काणादिकही श्राद्धात भोजनास सांगावे. श्राद्धास क्षण देण्यापूर्वी ब्राह्मणांची परीक्षा करावी, क्षण दिल्यावर परीक्षा करू नये. याप्रमाणे ब्राह्मणाचा विचार सांगितला.