सुवर्णाचे, रुप्याचे, तांब्यचे किंवा वस्त्रमय, किंवा क्बल, किंवा काष्ठमय, तृणमय, पर्णमय आसन प्रशस्त होय. काष्ठाच्या आसनात शिवण जांभूळ, कदंब, आंबा, बकुळ, शमी, भोकर, साळवृक्ष यांची आसने म्हणजे पाट प्रशस्त होत. लोखंडाचे खिळ्यांनी युक्त असलेले पाट ब्राह्मणांस देऊ नयेत. तसेच अग्नीने दग्ध झालेली लोखंडाची व भग्न झालेली आसने वर्ज होत. पितरांकडे प्राक्संस्था, दक्षिणसंस्था, ब्राह्मणांची पंक्ति बसवावी. त्यात देवांच्या आसनी पूर्वेकडे अग्रे होतील असे दोन दर्भ, पितरांच्या आसनी दक्षिनेकडे अग्र होईल असा एकेक दर्भ असे आसनांवर दर्भ स्थापावे. प्रत्येक ब्राह्मणाजवळ तुपाचा किंवा तेलाचा एकेक दिवा सव्याने व अपसव्याने लावावा. एकच दिवा लावणे असल्यास सव्याने लावावा. या वेळेपासून श्राद्धाची समाप्ति होईपर्यंत ब्राह्मणांनी मौन धारण करून हातात पवित्रे घालून उच्छिष्टोच्छिष्टाचा स्पर्श वर्ज करून ब्राह्मणांनी रहावे. या वेळी लक्षणयुक्त अतिथि येईल तर त्यास सव्याने ब्राह्मणांच्या पंक्तीस बसवून विष्णूच्या उद्देशाने त्यांची पूजा करावी. सव्याने 'अपवित्रः पवित्रोवा' हा मंत्र म्हणून 'वैष्णव्यैनमः काशप्यैनमः क्षमायैनमः' याप्रमाणे भूमीस नमस्कार करून 'मेदिनी लोकमातात्वं०' इत्यादि श्लोकाने स्तुति करावी व 'श्राद्धभुमि गयांध्यात्वा ध्यात्वा देव गदाधरं' इत्यादि मंत्र म्हणून प्राचीनावीति करून 'तद्विष्णोः परमंपदं०, तद्विप्रासो०' या मंत्राचा जप करून सव्याने प्राणायाम तिथ्यादिकांचा उच्चार केल्यावर अपसव्याने 'अमुक पितृणामुपक्रांतममुकश्राद्ध करिष्ये' असा संकल्प करून पूर्वी, मध्ये व शेवटी 'देवताभ्याः पितृभ्यश्च अमूर्तानाम चतुरिश्च यस्य स्मृत्या' याप्रमाणे त्रिवार पाठ करावा.