भरणी इत्यादि नक्षत्रे व व्यतिपातादि योग श्राद्धास घेणे ते अपराह्न व्यापिनी घ्यावे, असे दुसर्या परिच्छेदात सांगितले आहे. काही ग्रंथकार म्हणतात की, शुक्ल पक्षात सूर्योदयव्यापी व कृष्ण पक्षात अस्तमय व्यापी नक्षत्र घ्यावे आणि योग कुतुपादि व्यापी घ्यावेत. हे पार्वण श्राद्ध कुतुपादिक पाच मुहूर्त असता करावे. सायान्ह रात्री प्रातःकाल व संगव या काली करू नये. पिंडपितृयज्ञाच्या दिवशी सायान्ह कालीही पार्वण श्राद्ध करावे. काही एक विघ्नामुळे योग्य दिवशी सांवत्सरिक श्राद्ध केले नसेल तर त्या काली रात्रीही पहिल्या प्रहरापर्यंत करावे. कारण मृत दिवसाच उल्लंघन झाल्यावर चांडालत्वादि दोष प्राप्त होतात असे वचन आहे. ग्रहणादिवशी दर्श, मासिक व प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हे तीन प्राप्त झाले असता त्या दिवशीच अन्न, आमान्य किंवा हिरण्य यांनी करावीत. दुसरे दिवशी करू नयेत. प्रथमादिक श्राद्ध तेरावे मलमासात करावे असे सांगितले आहे. यासाठी जेव्हा बारावे मासिक श्राद्ध शुद्ध मासात होते. तेव्हा तेराव्या अधिक मासातच प्रथमाद्बिक करावे. जेव्हा अधिक मासात बारावे मासिक येईल तेव्हा बाराव्या मासिकाची द्विरावृत्ति करावी व चौदाव्या शुद्ध मासात प्रथमाद्बिक करावे. याप्रमाणे मलमासात आलेल्या द्वितीयादि मासिकाची द्विरावृत्ति करावी. द्वितीयादिक अह्निक श्राद्ध शुद्ध मासातच करावे. याप्रमाणे महालयही शुद्ध मासातच करावा, अधिक मासात काही एक करू नये. मलमासात मृत झालेल्याचे सांवत्सरिक श्राद्ध त्याच अधिक मासात आले तर अधिक मासातच करावे. शुद्ध मासात करू नये. दर्शाचे दिवशी वार्षिक श्राद्ध प्राप्त झाल्यास पुर्वी वार्षिक श्राद्ध करून दुसर्या पाकाने पिंडपितृयज्ञ व दर्शश्राद्ध ही करावीत. काही ग्रंथकार असे म्हणतात की, पूर्वी पिंडपितृयज्ञ, नंतर वार्षिक श्राद्ध व त्यानंतर दर्शश्राद्ध करावे. याप्रमाणे मासिकादि श्राद्धाविषयीही असाच निर्णय जाणावा.