जीवत्पितृकानें स्वकीय माता, अपुत्र सापत्नमाता, स्वपुत्र व सपत्नी पुत्र यांनीं विरहित असलेली स्त्री अपुत्र पितृव्य, अपुत्र मातामह व मातामही, यांचें दहन इत्यादि प्रेतकर्में करावींत. येथें अपुत्र पदानें मुख्य व गौण असे पुत्र, तसेंच पौत्र व प्रपौत्र, यांचा अभाव विवक्षित आहे. मौंजी न झालेल्या जीवपितृकानेंही मातेचें अंत्यकर्म करावें. त्याविषयीं विशेष निर्णय:--- तीन वर्षांहून कमी वयाचा असून चौल न झालेला जर असेल तर त्यानें दहन मात्र समंत्रक करावें व इतर क्रिया दुसर्याकडून करवावी. चौल झालेला किंवा तीन वर्षें पूर्ण झालेला असेल तर सर्व प्रेतकर्म समंत्रक स्वतां करावें. ब्रह्मचारी असेल तर त्यानें माता, पिता व मातामह यांचें अंत्यकर्म करावें; इतरांचें करुं नये. भर्ता व दौहित्र असतां भर्त्यानें मुंडन करुं नये. पुत्ररहिताची स्त्री व दौहित्र असतील तर स्त्रियेनेंच पतीचें अंत्यकर्म करावें. त्यांत दहन मात्र समंत्रक स्वतां करुन इतर कर्म संकल्पमात्र आपण करुन ब्राह्मनाकडून करवावें. भर्ता व सवतीचा पुत्र अशीं असतां सापत्न मुलानेंच अंत्यकर्म करावें; भर्त्यानें करुं नये. सापत्न पुत्र दौहित्र असतील तर सापत्न पुत्रानेंच अंत्यकर्म करावें. पुत्ररहित विधवा व विधुर यांचे भ्रातृपुत्र व दौहित्र असतील तर दौहित्रच क्रियाकर्मास अधिकारी आहेत, असें बरेच ग्रंथकार म्हणतात. विधवेच्या भर्त्याचा भातृपुत्रच व विधुराचा स्वकीय भ्रात्याचा पुत्रच अधिकारी आहे, असें जीवत्पितृकनिर्णयांत भट्ट सांगतात. अपुत्राची पत्नी व भ्रातृपुत्र असतां पत्नीच अधिकारी होय. याप्रमाणें पुत्र जवळ नसेल तर पौत्रादिकांस पितामह, पितामही इत्यादिकांच्या अंत्यकर्मादिकाचा अधिकार आहे. या रीतीनें जीवत्पितृकांस पितृकर्म, मुंडन व प्रेतकर्म इत्यादिकांचे अधिकार व अनधिकार विस्तारानें सांगितले. येथें विषयाचे बरेच भेद असल्यामुळें व बालांनांही बोध व्हावा म्हणून जी पुनरक्ति झाली असेल ती दोषास्पद नाहीं. सपिंड मृत झाला असतां सपिंडांनीं एकवार तिलांजली द्यावी, असें सांगितलें आहे. म्हणून ती तिलांजली जीवत्पितृकानेंही द्यावी. याप्रकारें मातामह, आचार्य इत्यादिकांसही द्यावी. अशा प्रकारें जीवत्पितृकाचा निर्णय सांगितला.