जेव्हां मातेचें वार्षिक श्राद्ध, पुत्ररहित मातामहाचें वार्षिक श्राद्ध अथवा अपुत्र पितृव्याचें वार्षिक श्राद्ध करण्याचा प्रसंग येईल तेव्हां क्रमानें "मातापितामही प्रपितामहीनां, मातामह मातृपितामह मातृपितामहानां; पितृव्य पितामह प्रपितामहानाम्" असा उद्देश करावा. "आपणास शक्ति नाहीं" इत्यादि कारणानें जेव्हां पिता इत्यादिकांनीं पुत्राची योजना केली असेल तेव्हां पिता इत्यादिकांनीं करावयास योग्य असलेलें श्राद्ध पिता इत्यादिकांचा प्रतिनिधी होऊन तो श्राद्ध करितो म्हणून त्या वेळीं "पितुः अमुकशर्मणो यजमानस्य पितृपितामह प्रपितामहानाम्" याप्रमाणें जसें श्राद्ध असेल तसा उद्देश करावा. बंधु अविभक्त असतील तर सर्व पितृकृत्यांत वडील बंधूसच अधिकार आहे. विभक्त असतील तर पृथक् पृथक् अधिकार आहे. सापत्न भ्राता ज्येष्ठ असला तरी कनिष्ठानेंच आपल्या मातेचें वार्षिक श्राद्ध व अन्वष्टक्यादि श्राद्ध करावें. पिता, पितामह हे जिवंत असतां उभयतां संन्यासी असतील तर पितामहाचें जें पित्रादिक त्यांस उद्देशून नांदीश्राद्ध, तीर्थ श्राद्ध किंवा दर्शादि श्राद्ध करावें. पिता, पितामह व प्रपितामह हे तीनही जिवंत असतां व संन्यासी असतां कोणतेंही श्राद्ध करुं नये. वृद्ध प्रपितामहादिकांस उद्देशून श्राद्ध करावें, असें कित्येक ग्रंथकार म्हणतात. पिता मृत व पितामह जिवंत असतां पिता व पितामहाचे पलीकडे दोन या तिघांस उद्देशून श्राद्ध करावें. याचप्रमाणें पिता व पितामह मृत आणि प्रपितामह जिंवत असतां असेंच जाणावें.