दत्तकानें तर जनक पित्याचा पुत्रादिक कोणी अधिकारी नसेल तर जनक पित्याचें श्राद्ध करावें व धनही घ्यावें. जनक पिता व पालक पिता, या उभयतांस संतति नसेल तर दत्तकानें उभयतांचेंही धन घ्यावें व उभयतांचें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करावें. दर्श, महालय इत्यादि दिवशीं दोघांही पित्यांचें श्राद्ध करावें. दोन्ही पित्रादिकांस निराळें पिंडदान करावें किंवा पित्रादिक दोघा दोघांच्या उद्देशानें एकेक पिंड द्यावा. याप्रमाणें दत्तकाच्या पुत्रांनींही दत्तकाचे जनक पित्यास पुत्रादिक नसेल तर आपला पिता, दोन पितामह, व दोन प्रपितामह यांचा उच्चार करुन दर्शादि श्राद्ध करावें. त्याचप्रमाणें धनही घ्यावें. तसेंच दत्तकाच्या पौत्रांनींही त्याच्या जनक पित्याच्या कुलांमध्यें प्रपितामहास पुत्रादिक नसेल तर एक पिता व एक पितामह यांचा उच्चार करुन दोन प्रपितामहांचा उच्चार करुन दर्शादि श्राद्ध करावें; व प्रपितामहाचें धनही घ्यावें. कारण जनक पित्यापासून मागचे जे तीन पुरुश त्यांच्या स्वस्त्रियांस अपत्य नसेल तर दत्तकानें व त्याच्या पुत्रादिकांनीं तीन पुरुषांस पिंड देऊन त्यांचें धन घ्यावें व एका पिंडाचे ठायीं दत्तक घेणारा पिता व जनक पिता, या दोघांचा उच्चार करावा. याप्रमाणें तिसर्या पुरुषापर्यंत जाणावें, इत्यादि लौगाक्षि इ० स्मृतिवचन आहे. जनक पिता व पालक पिता, या उभयतांसही पुत्रादि संतति असेल तर दत्तकानें दोघांचेंही अंत्यकर्म व वार्षिकादि श्राद्ध करुं नये. पालक पित्यास औरस पुत्र असेल व त्या औरस पुत्रापासून दत्तक विभक्त असेल तर त्यांनीं पालक पिता इत्यादि पार्वणीच्या उद्देशानें दर्शमहालयादि श्राद्ध मात्र करावें. विभक्त नसल्यास औरस पुत्रानें केलेल्या दर्शादि श्राद्धानेंच दत्तकाची दर्शादि श्राद्धसिद्धि होईल असें वाटतें.