अथवर्ण वेदीयांचा सर्व प्रयोग प्रपितामहापासून पित्यापर्यंत प्रातिलोभ्याने जाणावा. नंतर 'संत्वर्घ्याः' असे प्रतिवचन मिळाल्यावर पात्रातील पवित्रक ब्राह्मणांचे हातावर देऊन पहिल्या पात्रातील उदक खड्ग पात्रात किंवा दुसर्या पात्रात घेऊन 'पितरिदंते अर्घ्य पितामहेदंते अर्घ्य' इत्यादि जसे लिंग असेल त्याप्रमाणे प्रत्येक अर्घ्य द्यावे. पित्रादिकत्रयीच्या स्थानी एक ब्राह्मण असेल तर तीन पात्रांचे अर्घ्य एकाचेच हातावर द्यावे. सहांचा एक ब्राह्मण असेल तर सहा पात्रे एकाच्या हातावर द्यावी. पित्याचे स्थानी तीन ब्राह्मण इत्यादिक पक्ष असेल तर एक अर्घ्य विभागून तीन ब्राह्मणास द्यावे. अर्घ्याचे अंती उदक देणे व 'पितरिदंते अर्घ्य' हा अर्घ्यमंत्र म्हणणे हे प्रत्येक ब्राह्मणाचे ठिकाणी करावे. याप्रमाणे पितामहादिकांचे ब्राह्मणाविषयीही जाणावे. याप्रमाणे उदक घेऊन 'यदिव्या' या मंत्राने ब्राह्मणांचे हस्तापासून स्त्रवणारे उदक प्रत्येक ब्राह्मणाप्रत अनुमंत्रण करावे; असा ऋग्वेदीयांचा जाणावा. अन्यशाखीयांनी 'यादिव्या' या मंत्राने अर्घ्यदान करावे. अर्घ्यदान झाल्यावर प्रत्येक ब्राह्मणास उदक द्यावे. ब्राह्मण एकच असेल तर अनुमंत्रण करणे व उदक देणे हे शेवटी एकच वेळ करावे. निरनिराळे ब्राह्मण असतील तर आवृत्तीने प्रत्येक ब्राह्मणाचे ठिकाणी करणे. अर्घ्यदान करिताना नाम, गोत्र, इत्यादिकांचा उच्चार करू नये. श्राद्धसागर ग्रंथकर्त्यांनी नाम, गोत्र इत्यादिकांचा उच्चार करावा. हे योग्य वाटते. असे सांगितले आहे.
नंतर शेष उदकयुक्त पहिल्या अर्घ्यपात्रात दोन पात्रातील शेष उदक एकत्र करून त्याने मुख आर्द्र करावे. आयुष्याची इच्छा करणाराने नेत्रांवर सेचन करावे. कारण संस्त्रवनात समवनीय इत्यादि आश्वलायन सूत्र आहे. ब्राह्मणाच्या हस्तापासून गलित झालेले जे उदक तो संस्त्राव; त्याचे एकीकरण करावे असे काही ग्रंथकार म्हणतात. दर्शादि श्राद्धात मातामह पात्रातील उदकात मातुःपितामहादि दोन पात्रातील उदक एकत्र करून मातामहपात्रातील उदक पितृपात्रातील संस्त्रावात मिळवावे. मातृपार्वण पृथक असल्यास मातामहपात्रात एकत्र केलेले उदक मातेच्या पात्रातील उदकाशी एकत्र करून ते पितृपात्रातील एकत्र केलेल्या उदकात एक करावे, व ते संस्त्रावाचे पात्र देवांच्या ब्राह्मणांचे उत्तरेकडे अरत्निमात्र (मुंढाहात) प्रोक्षण केलेल्या प्रदेशी दर्भाचे ठायी उपडे व कूर्चासहित 'पितृभ्यःस्थानमसि या मंत्राने स्थापावे. अथवा पहिले पात्र उताणे संस्त्रावोदकासहित मंत्राने स्थापून तिसर्या पात्राने कूर्चपवित्रासहित आच्छादन करावे. या दोनीही पक्षी गंधादि उपचारांनी त्या पात्राची पूजा करून समाप्तीपर्यंत ते पात्र चाळवू नये व त्यास स्पर्शहि करू नये.
कात्यायन शाखी तर 'शंधताम' या क्रमाने भूमि प्रोक्षण करून 'पितृषदनमसि' या मंत्राने कुश आस्तिर्ण करून 'पितृभ्यस्थानमसि' या मंत्राने प्रथम पात्र उपडे करून गंधापासून दीपापर्यंत उपचारांनी पूजा करितात.