पित्यापासून अविभक्त असणार्या पुत्रांनीं निराळा वैश्वदेव करुं नये. कारण पितृपाकानें व भ्रातृपाकानें उपजीविका करणारा असावा असें वचन आहे. यासाठीं गृहाग्नीवर पाक, वैश्वदेव करण्याचा पक्ष असला तरी साग्निक पिता असतां एकत्र राहाणारे पुत्र साग्निक असून अविभक्त असले तर निराळा वैश्वदेव करुं नये. गृह्याग्नीवर पाक न झाला तर तो गृहयाग्नी लौकिक होतो, असें ज्यांचें मत आहे त्यांनीं अग्निसंस्काराकरितां गृह्याग्नीवर पाक मात्र करावा असें वाटतें. विभक्त असल्यास निराळा वैश्वदेव करावा. त्यांत वैश्वदेव, देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ रुप असल्यामुळें जीवत्पितृकानेंही पंचमहायज्ञांतील पितृयज्ञ करावा. तैत्तिरीय शाखीयांचे पंचमहायज्ञ वैश्वदेवाहून भिन्न असले तरी जीवत्पितृक विभक्त तैत्तिरीय शाखीयांनीं पितृयज्ञ करावा. कारण पितृयज्ञ देवरुपी पितृदेवताक असल्यामुळें त्यास पितृपितामहादि मनुष्यरुपी पितृदेवकत्व नाहीं. "मुंडन, पिंडदान व सर्व प्रेतकर्मही जीवत्पितृक व गर्भिणीपती यांनीं करुं नये." येथें मुंडन म्हणजे वस्तर्यानें मस्तकावरील केशाचें वपन होय. यावरुन केशांचें कर्तनही (कापणें) सिद्ध होतें. सर्व प्रेतकर्म म्हणजे प्रेताचें दहन, वहन व सपिंडीकरणापर्यंत और्ध्वदेहिकादिक कर्म असा अर्थ घ्यावा. मुंडन रागप्राप्तच निषिद्ध आहे. यावरुन चौल, उपनयन इत्यादिकांमध्यें आधान दर्शपौर्णिमास व ज्योतिष्टोम इत्यादिकांमध्यें नित्य प्राप्त झालेलें आणि तीर्थ, प्रायश्चित्त, मातेचें मरन इत्यादिकांत प्राप्त झालेलें नैमित्तिक मुंडण हें करावेंच. नागबली इत्यादि काम्य कर्मांत कर्तव्य असलेलें काम्य मुंडनही करावें, असें कित्येक ग्रंथकार म्हणतात. गंगा भास्कर क्षेत्र माता, पिता गुरु यांचें मरण, आधान व सोमपान या सातांतून कोणतेंही प्राप्त असतां वपन करावें. "गुरु म्हणजे दत्तकाचा जनकपिता व दत्तक घेणारा पिता" असा अर्थ आहे. दुसर्या वाक्यांत तीर्थाचे ठायीं क्षौर करावें असें सांगितलें असतांही गंगा व भास्कर क्षेत्र यांचा उल्लेख केला आहे. तो अशासाठीं कीं, जीवत्पितृकानें या स्थानीं विशेषेंकरुन क्षौर करावें, असें विधान करण्याकरितांच होय. जीवत्पितृकांस पिंडदानाचा निषेध सांगितला तो नांदीश्राद्ध, तीर्थश्राद्ध व पिता संन्यासी असल्यामुळें पुत्रकर्तृक दर्शमहालयादि श्राद्धें यांत पिंडरहित सांकल्पिक श्राद्ध करावें, असा बोध होण्याकरितां आहे.