दक्षिणजानु खाली पाडून देवांची पूजा करावी. वामजानु खाली पाडून पितरांची पूजा करावी. देवांचे कृत्य प्रदक्षिण व पितरांचे अप्रदक्षिण करावे. पितरांस मध्ये मोडलेले दर्भ असावे, व दैवकर्मास सरळ न मोडलेले दर्भ असावेत. दैवकर्म करताना कर्त्याने उत्तराभिमुख व पित्र्यकर्म करिताना दक्षिणाभिमुख असावे. संकल्प, क्षण देणे, पाद्य, आसन, आवाहन, अर्घ्यदान, गंधापासून आच्छादनापर्यंत ५ उपचार, अन्नदान, पिंडदान, अंजन, अभ्यंजन, अक्षय्य व स्वधावाचन यांचे ठायी संबंध, गोत्र व नाम यांचा उच्चार आवश्यक आहे. इतर ठिकाणी कृताकृत आहे. संबंध, गोत्र, नाम व रूप या क्रमाने किंवा संबंध, नाम, गोत्र व रूप यांचा उच्चार करावा. त्यातही बुद्धिमान पुरुषाने सर्वत्र गोत्र उच्चार सकारयुक्त करावा असे वचन असल्यामुळे "काश्यप सगोत्रस्य किंवा काश्यप गोत्रस्य' असा उच्च्चार करावा. कित्येक ग्रंथकार शाखाभेदाने व्यवस्था सांगतात. गोत्र अज्ञात असल्यास काश्यप गोत्र उच्चारावे. ब्राह्मणांचे शरमान्त, क्षत्रियांचे वरमान्त, वैश्यांचे गुप्तान्त व शूद्रांचे रासान्त याप्रमाणे नामाचा उच्चार करावा. पिता इत्यादिकांचे नामांचे अज्ञान असेल तर तात, पितामह, प्रपितामह असाच उच्चार करावा. नामोच्चार करू नये, असे आश्वलायनाचे मत आहे. अन्य शाखेचे ठायी पित्याचे नामस्थानी "पृथिवीतत् " पितामहाचे नामस्थानी 'अंतरिक्षसत्' व प्रपितामहाचे नामस्थानी "दिविषत्" असा नामोच्चार करावा. स्त्रियांचे दान्तनाम 'सावित्रिदा' असेच उच्चारावे. काही ग्रंथकार देवी शब्दान्त उच्चारावे असे म्हणतात; तर दुसरे काही ग्रंथकार देवी व दा या दोन्ही पदांचा समुच्चय करून 'सावित्रीदेवीदा' असा उच्चार करावा, असे म्हणतात. पितृकर्मात विभक्तीने समर्पण केलेले सर्व सफल जाणावे. विभक्तीशिवाय दिलेले सर्व व्यर्थ होय. संकल्प, क्षण व अक्षय्यकर्म ही षष्ठी विभक्तीने करावी. ब्राह्मणांस आसन द्यावयाचे ते षष्ठी किंवा चतुर्थी यातून एका विभक्तीने द्यावे. आवाहन द्वितीया विभक्तीने करावे. अन्नदान, पिंडपूजा, स्वधा, स्वस्तिवाचन ही चतुर्थी विभक्तीने करावीत. 'येचत्वा०' इत्यादि उच्चाराच्या पूर्वी पिंडदान करणे ते संबोधन विभक्तीने करावे; नंतर चतुर्थी विभक्ती याप्रमाणे ही दोन सर्व संमत आहेत. शेष सर्व कर्मे संबोधन विभक्तीच्या शेवटी यथायोग्य 'इदन्ते किंवा इदंवो' ह्याप्रमाणे योजना करून कर्म करावे. देवकर्म सव्याने व पितृकर्म अपसव्याने करावे. विप्रप्रदक्षणा, विप्रस्वागत, अर्घ्यदान, सुक्ते व स्तोत्रे यांचा जप, पात्रावर अन्न वाढणे, आव्हान, अन्नाचे अवघ्राण, स्वस्तिवाचन, तांबूलदानापासून समाप्तीपर्यंत हे पितृकर्म प्रदक्षणादिक सांगितले आहे ते सव्यानेच करावे. देवांची पूजा करणे ती पाद, जानु, अंसव व मस्तक, अंस, जानु व पाद अशी पूजा करावी. अक्षय्य, आसन व अर्घ्य ही वर्ज करुन पितरांस इतर सर्व देणे ते स्वधाकाराने द्यावे. देवास स्वाहाकाराने द्यावे. दैवकर्म दैवतीर्थाने व पितृकर्म पितृतीर्थाने करावे.