क्षमातळीं इजसमाज नाहीं उमामहेश्वर पुरी ।
पुरी पडेना काशी मग इतरा दासी न कोण असी हो पंढरी ॥
पांडुरंग जगदंतरंग जीमाजि रंगला धणी ।
पार्श्वि रमा रखुमाइ पृष्ठतो राहि जशी सुखाची खणी ।
शेषशयन पटुवेष निकट व्यंकटेश गणपति गुणी ।
उभा दक्षिणद्वारीं अतिभारी विठ्ठल विभुचे गुण गण गणी ।
बाळकृष्ण गोपाळ रांगता व्यालमुकुटमणि फ़णी ।
अहा तशीच ती भामा अतिवामा विभुच्या नायिकात हिरकणी ।
दार धरुनि सरदार उभा केदार लिंग अंगणीं ।
रंगशिळेवरि गाति किती नाचती गरुडस्तंभा कवटाळुनी ।
सभामंडपीं उभारुनी भुज उभा मरुत्सुत ऋणी ।
अहा गरुडपाराचीं किती शोभा त्याची वर्णावी तरि कुणी ॥
.........हा मंडप नोहे विमान वर थाटला ।
भूवैकुंठीचा गगनाने चाटला ।
ज्यामध्यें सदोदित भगवज्जन दाटला ।
की भवार्णवीचें गलबत मज वाटला ।
कामादिक जलचर जमाव चट फ़ाटला ।
क्षण यामधिं शिरतां वाटे भव आटला ।
मग सहजचि उतरुनि पांडुरंग भेटला ।
..........बर्या दिसति ओवर्या ऋषींच्या दर्या दुबाजूवरी ।
सदा घोष नामाचा गुण ग्रामाचा घेती कितिक अंतरीं ॥१॥
महाद्वार तुम्हि पहा तरिच जन्म हा सफ़ळ मानवी ।
वरी चौघडा वाजे अति साजे काहिल मढविली नवी ।
बळीं तसा पदतळीं घातला मुळीं हरिस लोभवी ।
नको कथा वाम्याची त्या नाम्याची यापरी विश्वशोभवी ।
पुढे समाधिंत दडे पदांबुजि पडे न चोखा भवीं ।
असो महार यातिचा जातीचा हरिच्या भागवतोत्तम कवी ।
रुका वेचिता दुकान जवळिच बुका माळ लाघवी ।
देति माळिणी माळी चित्ती सुक्या न रिझ आघवी ।
अशा दुरस्ता विशाळ माड्या तशात यदुकुल रवी ।
उभा नदीच्या काठी जन येती भेटी वकीलसा पालवी ।
जे महार्णवाची जगदभुत कामिनी ।
ती भीमरथी या स्थळिं दक्षिणगामिनी ।
श्री शंकरजीची शिरोवंद्य स्वामिनी ।
पृथ्वीच्या जाणे मध्यदेशी हा मणी ।
जै कार्तिक मासीं शुक्लपक्ष यामिनी ।
पुलिनांत पताका जैशा सौदामिनी ।
आनंद सावता माळि कबिर मोमिणी ।
लोहदंड त्या क्षेत्र पंढरी पुंडरीक चौधरी ।
हा मुख्य येथींचा राणा जाणा ज्यास्तव उभा अजुन विटेवरी ॥२॥
शिळामूर्ति रघुकुलाधीश पदतळाजवळ ती सती ।
उभी अहिल्याबाई करि घाई जणो पुनरपि रज याचिती ।
पुढें दक्षिणेकडे प्रदक्षिण घडे क्षेत्र सव्य ती ।
दिव्य चमकती फ़रशी सज्जन चरणरजें उजळती ।
लोट घेती किति पोट खरडिती ओठ भजनिं हलविती ।
गळा तुळशीच्या माळा सवे पाळा गोपाळाच्या किति नाचती ।
नवे भागवत थवे प्रदक्षिण सवें कितिक धावती ।
पंगु लागती रांगूं किती सांगू अंधळे भुजा भुज कवटाळिती ।
रथा निरखिती कथा करिति कुणी पथांत मठ तरि किती ।
सव्य रोकडा घेती मग पुढती उध्दव चिदघन आलिंगिती ।
पुढे घाट नदीचा भीमरथी वाहती ।
किति तीर्थ-वंदने करिती किति नाहती ।
किति पुंडरिकाचा समारंभ पाहती ।
किति साधु पदांबुजिं निजमस्तक वाहती ।
किति शान्त दान्त वेदान्त पढुन राहती ।
किति तापस ऋतुसंताप समुळ साहती ।
मग मुक्ति तयांला गळा पडुनी पाहती ।
संत कथू किति महंत नगरी अनंत सुखदा करी ।
काय कथेचा धारा तो सारा श्रीमत्खासगीच्या मंदिरी ॥३॥
घरोघरीं रस परोपरी किति बरोबरीचे गडी ।
साधु साधिती विद्या किति अध्यापक किति शिष्यांच्या सांगडी ।
दाट साधुचा हाट फ़ुटेना वाट वाटता गडी ।
ताल सुराची करिती किती भरती विठ्ठल देती बुक्याची पुडी ।
फ़ळात अथवा जळांत तुलसीदळांत बसता खडी ।
अशी माउली कैची भक्ताची नवैची ताजिम देते खडी ।
तुकया वाणगट तक्या मारि परि मुक्यापरी दे दडी ।
मिराबाइचा प्याला नाम्याला भ्याला प्याला त्याची कढी ।
भाव निरखितो राव सुरांचा हाव घालतो उडी ।
पुढे ठेवा कण वाळुचा कनवाळू विठ्ठल म्हणतो साखर खडी ।
हा भक्तासाठीं अवतरला या कली
ती वैकुंठीची पेठ वोस हाकिली
ही अपरा द्वारावती उभी ठाकली
मंडळी व्रजांतिल कोठें नच फ़ाकली
वसुदेव देवकी नंदादिक झाकली
आहेत कोणत्या रुपें कोण आकळी
पंढरी सुखाच्या नरदेहे वाकली
मला वाटतें बलानुज द्विज कुलाधिश हा हरी ।
येती राउळी अवघे ते बडवे यांचे गोप गोपिका घरीं ॥४॥
संत खेळती वसंत ऋतूंत भगवंत घेतसे हवा ।
शेज करिती कुसुमाची तळीं माचा वरता चंदनी मंडप नवा ।
वृष्टि सुखाची सृष्टि देखती दृष्टि भरुनि जेधवा ।
तदा आषाढी यात्रा या जनमात्रा सुख तें पार नसे उत्सवा ।
तटा धरुनि घनघटा उदकमय पटा पसरती शिवा ।
पुंडरिका वर नावा न वर्णवे महिमा मति तरी किति मानवा ।
तशी पुढति कुणि दिशी कार्तिकी निशि मग जन बोलवा ।
फ़ार वदावें कायी ही बाई वैकुंठींचा मालवी दिवा ।
नदी खडक त्यामधीं करितसे गदेश मुरलीरवा ।
वेणुनाद तो समजा मनीं उमजा गोपद विष्णुपदाला स्तवा ।
किति नारदमुनिला कवटाळिति बाहुंनी
गोपाळपुरी मग दधिकाला लाहुनी
किति हर्षति पद्मालयतीर्थी नाहुनी
तो व्यासाश्रम दर्शनानंद त्याहुनी
किति संध्यावळिमध्यें तप करिती राहुनी
अशी किती तीर्थे तुज कथूं शपथ वाहुनी
पृथ्वींत पंढरी एकच घ्या पाहुनी
पाय धरिल कविराय दुजा अशी काय लावणी करी ।
माय कुणाची व्याली या गगनाखालीं कविता सोलापुरी ।
क्षमातळी..........॥५॥