कैसा निपटपटु जाहालासि कान्हया रे ॥ध्रु०॥
पाणियासि जातों आम्ही परयुवती ।
भरभरली जळो तुझी नव नवती ।
तूं भरिं भरलासी तुला कोण लवती ।
ही काय खोड रे ।
जाऊं दे सोड रे ।
करुं नको वाढ रे । शिवाया रे ॥१॥
आम्ही कोण तुझ्या आम्हां वाटेमध्यें अडविशी ।
नाहक हक जी कशासाठीं वाढविशी ।
फ़िर्याद नंदाकडे सांगाया धाडशी ।
हे काय पाप रे ।
देऊ नको ताप रे ।
भला तुझा बाप रे । म्हणाया रे ॥२॥
संगतीच्या गवळणी गेल्या सार्या बायका ।
जाऊं दे सोड मला यदुकुल नायका ।
इतुकी ही गोष्ट माझी आजि तुम्ही आयका ।
हा काय न्याय रे ।
म्हणूं तरी कायरे ।
आला कविराय रे । धराया रे ॥३॥