नंदकिशोराची होरी जळो बळजोरी पिचकारी मारी ॥ध्रु०॥
यासाठीं याला मी वंचून बा जात होते मज गांठी ।
काय वदों कुच मर्दुनि माझी तोडुनि नेली गांठी ।
हाच मेला मूळ, नाशितसे कूळ कंचुकिच्या सोडी गांठी ।
आज उद्या याचें तोंड काळे करुं जाउं कोठें दिन चारी ॥
नन्दकिशोराची ॥१॥
फ़ाग तरी रंग राग पराव्या काय धराव्या बाला ।
ऐशी तोंडावर देईन याच्या भीईन कां मी बाला ।
हा काय मोठा गोकुळिचा धनी दावितसे दाबाला ।
सासू माझी जीव देइल याच्या येउनिया आज दारीं ।
नन्दकिशोराची ॥२॥
मस्त मेला माझे कुस्त केले वपु सांगु कंस मामाला ।
याचे बापाचे काय खातों गे बाइ भिड काय आम्हाला ।
हा काय होइल आम्हाला गाई माय बापू नये कामाला ।
काय वदूं कविराय म्हणवितो हाय जाली सारी ।
नन्दकिशोराची ॥३॥