मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
मृगजळवत जग हे उध्दवलें...

रामजोशी - मृगजळवत जग हे उध्दवलें...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


मृगजळवत जग हे उध्दवलें हें जाण सर्व माया ।

देखत भूल हें समजून कां भुलशिल वाया ॥ध्रु०॥

हो सावध हो सावध मूर्खा भुलुनि नको जाऊं ।

मदांध होऊनि परस्त्रियांची मुखें नको पाहू ॥

मी कोण कुटिल हा शोध करी पामरा ।

हा विवेक चित्ती कांहीं ठसू द्या जरा ।

विषयास भुलुनि करशिल नाना तर्‍हा ।

विकल पडुन हें क्षणात जाईल बुदबुदवत काया ।

देखत भूल हें समजुन कां भुलशिल वाया ॥१॥

कोणी नव्हे कुणाचें हा तूं विचार करी चित्तीं ।

अकस्मात यम घाला घालिल मग फ़सशिल अंतीं ।

चित्रगुप्त यमदूत सभेप्रति येऊन तुज पापें ।

पुसतील जेव्हां काळरुपि ते मग होईल फ़ें फ़ें ।

मग स्मरेल तुज हें त्या वेळेस सांगणें ।

मग देवही न करी आठवितां धावणें ।

मग नाहीं फ़ळ वांचुनिया धिक धिक जिणें ।

काम क्रोधादिक षड्रिपु तुज बसले फ़सवाया ।

देखत भूल हें समजुन कां भुलशिल वाया ॥२॥

नाना योनी फ़िरता प्रभूला तुझी करुणा आली ।

तारावयाला यांतुनि तुजला नरकाया दिधली ।

याला विसरुन विषयी गुंतून वर्तशी उफ़राटा ।

याच गुणें प्रभू कोपून देईल नरतनुला फ़ांटा ।

ही पुनरपि नरतनु तुजला न मिळे कदा ।

मग नाना योनीं भ्रमत असावें सदा ।

चिरकाल तयांतिल भोगावी आपदा ।

भव सांडुनि अग्निस्पर्शे उडती वरति जशा लाह्या ।

देखत भूल हें समजुन कां भुलशिल वाया । ॥३॥

जो जगदीश्वर पतितपावन शरण तया जावें ।

आशाकामादिकां अगोदर सोडुनिया यावें ।

मूर्खपणा तूं मनीं मानशिल जगदीश्वर पैसा ।

जन्ममरणसंबंधी भवाब्धि तो तारिल कैसा ।

या अशा रीतीनें करशील आपुली धुळी ।

बा स्वार्थास्तव सत्संगा धरावा मुळीं ।

तू निशिदिनिं वदनी वद शिव नामावळी ।

कविराय तुला सांगतसे हें की भजोनि हरिपायां

देखत भूल हें समजुन कां भुलशिल वाया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP