अरे कांहीं बोल वाणी झालें पहा दीनवाणी ॥
करुं नको वेड्यावाणी दिसतें मी केविलवाणी ॥ध्रु०॥
तुझि माझी प्रीत कैसी अरे सख्या कोठें गेली ॥
कांहि तरी आण चित्तीं हे काय बोली ॥
मला वाटे रांड कोणी गड्या तुला प्यारी झाली ॥
माझ्या नांवें घातक्या सोडियलें त्त्वां केवी पाणी ॥१॥
हातावरी हात माझ्या देउनियां जाशी कैसा ॥
कांही तुला मागते मी सुपारीचें खांड की पैसा ॥
अपराधि काय झालें सांगा की जी खाली बैसा ॥
असा कां रे प्राण घेशी अबरुची जिनगाणी ॥२॥
कसबिणी बायकांची शहरी या फ़ार दाटी ॥
आतां काय बोलावे म्यां लागलाशी त्यांच्या पाठीं ॥
यंदा माझी फ़ागाची त्त्वा कोठे घालविली गांठी ॥
कविराया काल रात्रीं केला रंग झालीं गाणीं ॥३॥