हरिपद वंदा मग धंदा दुजा गोड रे ॥ध्रु०॥
दो दिवसाची तनु साची धरा लाज रे ।
निजहित साधा भवबाधा पळो आज रे ।
धनसुतदारा मुडदारा करी वाज रे ।
मन हें भुलतें नको भलतें करुं काज रे ।
मग चुकविल पाळी वनमाळी महाराज रे ।
जन भोंदावया बांधावा किती साज रे ।
असुनी डोळे-झांक करावे ।
रांडापोरे कितिक भरावे ।
काळामुखामध्यें तनु घसरावे ।
मग यदुपतीला बळें विसरावे ।
नरतनु तुमची जाईल व्यर्थचि फ़टफ़ट मतिमंदा ।
सुखकंदा मनी जोड रे ॥हरि०॥१॥
उंच जराच्या पदराचा किती झोक रे ।
किती धगडीची पगडीचा पुरे नोक रे ।
नौबदखाना समजाना दुजा शोक रे ।
कीर्तनाचा भजनाचा तुम्हा षोक रे ।
हा तर टाळा पर न विटाळा तुम्ही लोक रे ।
करितां जागा न वागा मग पाठी फ़ोंकरे ।
नरतनु तुमची काय शिराणी ।
पाहतां ही तर निपट विराणी ।
कां भुलला मति करुनि दिवाणी ।
कोणी निजहित मानस नाणी ।
कविरायाची लटकी न वाणी ।
बळकट वंद्य करी नंदात्मजी रे ॥हरि०॥२॥