दूर होय कान्हा आम्ही तुशीं खेळुनी होरी ।
तुटली मर्जी तूं गर्जी नको बळजोरी ॥ध्रु०॥
कालच गडे म्यां यार्शी केली होजीं बोली ।
शिवूं नये अंगा नको दंगा करुं वनमाळी ॥
हा तर ख्याली याची कोण जाणतो खोली ।
भिजल्या पोरी कशी होरी ग हे घरघाली ॥
झुंबर करितो तिथे कोण कुणाचा वाली ।
केली गर्दी रंगाची सर्दी ओली ॥
भरले डोळे बाई अजून जाईना लाली ।
फ़ेडी लुगडी कुच रगडी या काय चाली ॥१॥
अंगे भिजली रंगामध्ये दंग जाहलें मी वेडी ।
तशामाजी बाई हा हळुच कंचुकी सोडी ॥
या खेळाची याला अशी काय गे गोडी ।
धूम करुनी भर गुलालांत संग जोडी ॥
गडे हा करितो दुसर्याची टवाळी खोडी ।
माझी केली काल फ़ारच ओढाओढी ॥
मुक्तामणीचे माझे हार गळ्यांतील तोडी ।
याच्या सगळ्यां म्यां ओळखून ठेविल्या खोडी ॥२॥
डोळा नुघडे दुमदुमला रंगीत वेणु ।
गुंगित होते तो कर्णी ऐकिला वेणु ॥
रंजित कुंजी मधु मंजुळ रस मनरेणु ।
गर्दी उडाली काय सखे स्वमुखे मी वाणूं ॥
ते दु:ख सखये मग आमचे आम्ही जाणू ।
आहे हा दिन का मध्यान्ह रात्र हेही न नेणूं ॥
बळकट होती कांहीं आयुष्याची दोरी ।
म्हणुनि वाचुनि आलो आम्ही सासुरवासी पोरी ॥३॥
यापरी रुसली घरी बसली हरी समजावी ।
नकळत झाले चाल तूं अशी न मी चिडवी ॥
खेळ खुषीचा इथें मर्जी ग कां बिघडावी ।
दो दिवसांची सखी होरी रती पुरवावी ॥
तूं मज वाली सार्यांनी जूट बांधावी ।
बरीं कीं माझी रंगांत तनु भिजवावी ॥
गोपी जमुनी कुंजांत मौज खेळावी ।
तुजकडे आलों मसलत कांहीं सांगावी ॥४॥
ऐकुनि उठली खटपट मजामधें होती ।
हरिचा धरिला तिने हात नेला एकांतीं ॥
भोगिला पुरता मिळविली ज्योतीला ज्योती ।
आंतून तिकडे वर यदुपतीला भर देती ॥
मिसळून गेली भिजविलाच कंसाराती ।
गेले येऊन मग कुंजनवाला हो ती ॥
ऐशा लीला करी आनंद तो अवतारी ।
त्याची होरी कविराय गातसे थोरी ॥५॥