हरिवांचून संसार कशाचा । किति साजणी धीर धरुं ।
चैन पडेना कसें करुं ॥ध्रु०॥
चुटका लाउनि जिवासि गेला । ही स्वप्नींची गत झाली ॥
त्यानें ग आपुली सोय पाहिली । कशास येइल वनमाळी ॥
कोठें ग होती रांड कळे ना । सवत कपाळी घरघाली ॥
या नंदाच्या कुळीं ऐकिल्या । नवत्या कधि ऐशा चाली ॥
ती पडली ग आमुचे डाई । रांड पोट जाळीचे पायी ॥
हा घात जाहला बाई । चिखलांत फ़सविल्या गायीं ॥
दूर जाऊन कुठें वनी शिरुं ॥ हरि ॥१॥
मी म्हणतें ग बाई उत्तम कुळिंचा का रतला बटकीपाशी ॥
पांडवघरचा खरा दास हा ती कंसाघरची दासी ॥
योग्य जाहला संग म्हणावा काय गडे या दैवाशी ॥
कुणि उध्दरितो जन्मा येउनि कुणी आपुलें कुळनाशी ॥
दासीच्या शिरला घरीं । तिचि याचि काय तरि सरी ॥
दासीच्या बंदा हरी । काय मी सांगूं तरी ॥
ऊर बडवितें कटून मरुं ॥ हरि ॥२॥
क्रुर कठोर अक्रुर कशाचा ह्या मेल्यानें घालविलें ॥
कान फ़ुंकुनी माधव नेला तेज आमुचे मालविलें ॥
अमृताच्या कुंडांत कसे विषबोट घालुनि कालविलें ॥
या कुब्जेने मसलत करुनी नकळत त्याला पालविले ॥
ही जळो बिघडली भटी । नाही झाले ठीक शेवटी ॥
ही दुर्गंधाची घुटी ॥ ती कविरायाची नटी ॥
रांड मुलखाची पोटभरु ॥ हरि ॥३॥