कुंजात मधुप गुंजारव यमुनातटीं ।
होरी खेळतो हरी करुनि राधा नट आपण नटी ॥ध्रु०॥
लतागुच्छ सुरतरुही तुच्छ वरी रुजंती करिती मधुकरी ।
विमान वरी दाटल्या उतरल्या गगनीं सुरसुंदरी ।
सुरताल पखवाज खंजिरी मंजरीत बासरी ।
बिन अमृत कुंडली कुणी डफ़ सारंगीला धरी ।
नृत्यकृत्य तत्कार तान करताल झुमकझ्या अंतरीं ।
मोरचंग झांजरी पतीसंपत्यही नानापरी ।
रुपरम्य राधेचे राधा वल्लभ आपण घरी ।
तिलोत्तमा उर्वशी मेनका रंभापरी घाबरी ।
फ़ागामधीं बागात मातला वसंत अंत:पुरीं ।
कवण राधिका पति कवण राधा हे न कळे खरी ।
अग सखे ग आनंद मी सांगू किती । अगे सखे०
एकमेकावर टाकिती । अगे सखे०
कुंकुम अबीर झोकिती । अगे सखे०
पिचकार्या मुखी मारिती । अगे सखे०
केशर मृगमद उडविती ।
या रसाचा कोण जाणता सुरनर हातवटी ।
होरी खेळतो हरी करुनि राधा नट आपण नटी ॥१॥
श्रीहरीचें वयरुप धरुनि राधा नट नागरधणी ।
पीतवसन बासुरी मुगुट शिरीं तिळभर नाहीं उणीं ।
हावभाव नृत्यात नटाकृति भाव दावितें क्षणीं ।
मदनमूर्ती सावळी तनू सुकुमार फ़ार देखणी ।
तथै तथै तननन नननन वेणुरव किंकणी ।
नृत्यगीत माधुरी हरीची जाणत कालिया फ़णी ।
गर्वरहित गंधर्व सर्व त्या वसंत संतर्पणिं ।
कंठी घालिती मिठी म्हणती राधेला यदुकुलमणी ।
रास जग जनकास मुखामध्यें हास हिर्याची खणी ।
बुलाख नथ नासिकीं चमक जशी शुक्राची चांदणी ।
अग सखे रंगरसामधी यदुनायका ॥अगे०
नच ओळखिती कितिक बायका ॥अगे०
धरुनि मुरलीच्या गायका ॥अगे०
सोडिती नयनसायका ॥अगे०
कुणी म्हणती हरी आयका ॥अगे०
हे मोठे कीं नवल राधिका ॥अगे०
घरी नटवर कुचतटीं ।
होरी खेळतो हरी करुनि राधा नट आपण नटी ॥२॥
वसंतऋतु संतान कुंज ते तरुवर फ़ुलले फ़ुली ।
किती फ़िरती गोपिका किती रंगामधी भिजल्या मुली ।
शुक पीक बक कोकिळा कामपक्षामधीं पडल्या भुली ।
मयुर वर नाचती दिली गती कन्यानें आपली ।
कंद मंद मकरंद धुंद पिचुमंद बकुळवन खुलल्या खुली ।
गुलाब मधु मालती मोगरा बट चंपक मखमली ।
मंदशीत अति सुगंध पवनासहित कुसुम लाखुली ।
किती रासमंडळी गुलाल ही लाल ललित पाऊली ।
स्त्री वेषें हरी होरी खेळतो नवल काय गोकुळीं ।
अनंत कौतुक करी धरी अवतार कृष्ण माउली ।
अग सखे रासांत धूम मातली । अग सखे०
श्रीरंगमूर्ती पातली । अगे सखे०
रंगात तळी घातली । अगे सखे०
गोपिका सकळ रातली । अगे सखे०
ठाऊकी न किल्ली आतुली । अगे सखे०
सत्य सत्य हे भामा रुसली । अगे सखे०
कशी येईल शेवटी ।
होरी खेळतो हरी करुन राधा नट आपण नटी ॥३॥
पुरुषवेध राधा निजवेष कवटाळुनि चुंबिती ।
हरी म्हणून गोपिका शुध्द राधेला आलिंगिती ।
अंगसंग रतिभंग दंग रंगामधी किती लाजती ।
मनीं म्हणती कामिनी नव्हे माधव सुखसंगती ।
अष्ट नायका कृष्ण म्हणुन राधेला कवटाळिती ।
काय सांगु मी तरी विचित्र होरी मज भासती ।
सार साक्षी संसारसार कंसारी धरुं धावती ।
कुणी व्यजन चामरें धरितीं पिचकार्या चिपळ्या किती ।
ज्या रासामधी गुलाबकेशरी मृगमदनदी बाहती ।
अशी धूम मातली कळेना कोण गाण (?) गोपि कापती ।
अग सखे धांवत आलें तुजकडे । अगे सखे०
सांगाया दु:ख रोकडे । अगे०
आधीच तुझे वाकडे । अगे०
मोठे मज सांकडे । अगे०
कपट रुपिणी राधा येऊनि धरील तुझी हनुवटी ।
होरी खेळतो हरी करुन राधा नट आपण नटी ॥४॥
रासामधी हरी लागी समजले भामा रुसली पिशी ।
निजरुपांते घरी करी खटपट पट पिवळा कशी ।
रंगांतुनि सदनांत एकटा हरि पोहचे तिजपाशीं ।
सचिंत पशुचे रिती तशी मंचकावरी ते मुसमुशीं ।
हळुच पद चुरुनि तिचे मांडीस देतसे उशी ।
उठुनि म्हणे भामिनी सवती मजपुढें सोंग मिरविशी ।
त्या कपट्यांचे रुप धरुनि किती रांडेला कवटाळिशी ।
तसे मजही पाहशी कळेना सये वो मज चौकशी ।
ऐकुनि हरी म्हणे भोग जाहला गोष्ट करावी कशी ।
हात ओढुनि तिला म्हणे मी कृष्ण वृष्णीच्या कुशी ।
अग सखे नको संशय धरुं फ़ारसा । अगे०
घे क्षणभरी रती सुख रसा । अगे०
करीं कंकण नको आरसा । अगे०
अग सखे ग - भामा सुखपडे गारसा ।
कविरायाने यापरी नेली रासामधी गोमटी ।
होरी खेळतो हरी करुन राधा नट आपण नटी ॥५॥