दैवें ही गांठ बयाबाईची ।
मज पडली साची ।
कविता इजसंगें रंगा आली ।
नानाविध चाली ।
वाणी काय परीक्षा झाली ।
गाणारी धाली ।
ऐशि मति नरांत विरळ रसाची ।
बायकांत कैची ॥१॥
आहे घरोघरीं पुण्यामधिं गाणें ।
परि खोटें नाणें ।
आलाफ कंठामधिं घेति किराणे ।
हें लाजिरवाणें ।
पुण्याविण कविता नच येयाची ।
शूद्रास कशाची ॥२॥
कवितारस मनांत झडकरि यावा ।
पुण्याचा ठेवा ।
दाता परि नीरस काय करावा ।
जन मार्मिक व्हावा ।
धन्या सत्कविता कविरायाची ।
रसिकता बयाची ॥३॥
देंवें ही........