कुंजात वाजवी वेणु भोंवताल्या चरती धेनु । कीं उडती रेणु ॥ध्रु०॥
सावळा सगुण जगजेठी । ब्रह्मांडें ज्याच्या पोटीं टेकण काठी ।
देहुडा पदाची धाटी । दिलि यशोदेने तुपरोटी बांधी पोटी ।
घोंगडें शिंकें लंगोटी । काल्यानें भरली वाटीं न्याहरीसाठीं ।
विटी दांडु लगोर्या गोटी । सवें गोपालांची दाटी गडबड मोठी ।
डोइस लहान चिंधोटी । डोकावित यमुने कांठीं बोटें चाटी ।
काय सांगू गे याची करणी । खेळतां न तापे धरणीं ।
वरि शीतल होतो तरणी । पशु बाळहि लागति चरणीं ।
आम्ही म्हणों कीं मुल हें पिसे । उगिच फ़िरतसे ।
म्हणुनि भलतसे न मानु । मानुं मानुं याचा खेळ कसा काय वेणुगे ।
कुंजात वाजवी वेणु ॥१॥
म्हणे दुसरी हा अवतारी । याची काय गुणाची थोरी जाणती सारीं ।
दिवसात वासरें चोरी । निशिं घरांत शिरे बळजोरी करितो चोरी ।
दहिंदुध समेटुन घेरी । नवनीत शेलकें हेरी आणिलें खोरी ।
बांधुनि घेतसे हा जरी । मग आपण राहुन दारीं पोरें सारी ।
घालुन आंत बाहेरी । पसरितो सराटे भारी कांटवणा बोरी ।
काय कसब सांगू रीतीचें । पाहतांना मुल जातीचें ।
भलें कुलीन कीगे गरतीचें । घरबुडतितसे भलतिचें ।
आता कुठवर सांगू मी तरी । पडेल कशि पुरी न जाणूं ।
जाणूं जाणूं यांचे किति म्हणून दुर्गुण वाणूं । वाणूं वाणूं ।
कुंजात वाजवी वे० ॥२॥
सांगतसे निज गार्हाणीं । बाई दिसतो चोरावानी ऐका कानी ।
यांचे काय पाहिलें पाणी । नंदाची विटली राणी पुसेना कोणी ।
मातलाच खाऊन लोणी । फ़ेडी लुगडीं करी धुळधाणी ओढितो वेणी ।
किती दडपि बायका कोनीं । किति गेल्या गाव टाकुनि ।
डोळा नुघडे दुमदुमला रंगित वेणु । रंजित कूजित मधु मंजुळ रसभंग नेणूं ।
गर्दि उडविली घाबरलें काय मी वाणूं ।
बळकट होती कांही आयुष्याची दोरी ।
वांचुनि आलो आम्ही सासुरवाशी पोरी । कुंजात वाजवी० ॥३॥
यापरी रुसली घरीं बसली हरि समजावी ।
नकळत जालीं गडे चाल तूं दुजी चिडवावी ।
खेळ खुषीचा येथें मर्जि ग कां बिघडावी ।
दों दिवसांची सखि होरी रति पुरवावी ।
तूं समजवाली सार्यांनी जुट बांधावी ।
बरि कीं माझी रंगांत तनु भिजवावी ।
गोपी जमल्या कुंजांत धुम कळवावी ।
तुज म्हणालो कांहीं मसलत मज सांगावी ।
ऐकुनि उठली खटपट ही मनामध्यें होती ।
हरिचा धरिला तिणें हात मिळविली ज्योति ।
आतुनि तिकडे वर यदुपतिला भर देति ।
मिसळुन मेळीं भिजविलासच कंसाराती ।
यशोलीला करि अनंत जो अवतारी ।
त्याची होरी कविराय गातसे थोरी ।
कुंजात वाजवी वेणु भोवताल्या चरती धेनु कीं उडती रेणु ॥४॥