श्री सांबाच्या समान दैवत न त्रिभुवनिही दुजें ॥
सुरांचे मंडळ याहुनि खुजे ॥ध्रु०॥
वरकड म्हणविती देव सुरांतील महादेव हा खरा ।
भवार्णवलीला ऐकुनि तरा ।
विचित्र भूषण पहा जयाच्या शिरीं गंगेचा तुरा ।
ललाटीं चंद्र तिलक साजिरा ।
स्त्रीकृत ज्यानें अस्त्रीकृत हरि मारी त्रिपुरासुरा ।
सुरांचा करुनि मनोरथ पुरा ॥
स्वीकृत अस्वीकृत जाणोनि गहिनगहरा ।
वर्णिता पुरी पडल या नरा ।
स्त्रीकृत मग अस्त्रीकृत जाणे नि मगहि नगमे हरा ।
पहा कशी हे विचित्र लीला जाळुनि रतिच्या वरा ।
कवळिली अर्धांगी सुंदरा ॥
कुंडल युग कुंडलीश कर्णी झाला कंकण करा ।
नांदतो करुनि नगाच्या घरा ।
काळकुट विष जाळित सुटलें जे ब्रह्मांडोदरा ।
हाचि घे तशाहि दु:सह गरा ।
॥चाल॥
या कर्में भोळा न म्हणा विद्योत्तमा ।
किती राजनीतीची यांत दाविली शिमा ।
हे दारुण विष यास्तव शिरीं धरी चंद्रमा ।
रिपुमदन पिशाचा करितां अंगी उमा ।
हे प्रळयाग्नीवरी ठेवी सरिदुत्तमा ।
॥चाल॥
अगाध कृत्यें अशीं न कोणी केली देवें दुजें ।
करावी पिनाकविलसदभुजे ।
श्री सांबा० सुरा० ॥१॥