बापा अति हितकर गुरुशीं भजावें । गुरुलागी भजावें ॥ध्रु०॥
धंदा त्याविण नसावा दुसरा । गुरु नामची पसारा ।
नाही तरी बसल एखादा घसरा । सारा आनंद दिवाळी दसरा ।
गुरुपाई न विसरा । त्यांचे सेवेंतची वपु झिजवावे । गुरुलागी भजावें ॥१॥
माता तातादिक गुरुला गाती । ते मुक्तीस जाती ।
कांही मग नसे कुणाचे हाती । ही लटकी जाती ।
मरती गुरुवांचून लाता खाती । ते नरकामधी पडती ।
त्याला सुरवरसम पुजावे । गुरुलागीं भजावे ॥२॥
ऐका गुरुराज कृपेची छाया । दुर करिती माया ।
कैचा भवपाशची हा उकलाया । गुरुवांचुनिया वाया ।
खोटी लेकरे कोणाची जाया । गुरुमाउली गाया ।
ऐसे कविराय सुमत समजावे । गुरुलागी भजावे ॥३॥