मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
उगा भ्रमसि वाउगा कशाला...

रामजोशी - उगा भ्रमसि वाउगा कशाला...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


उगा भ्रमसि वाउगा कशाला युगांत खळ हा कली ।

कलि मातला सारा घनदारा इच्छि राज्यास

इच्छि राज्यासही हाकली ॥ध्रु०॥

कोणा न कुणि मना येइल तसें जनासि जन वंचिती ।

धनानिमित्तें मरती किती गरती धरुनि यवन अन्न चारिती ।

आठ दिवसामधीं पठाण निंदा लुटावया धांवती ।

उठाव याला तकवां नाहीं बकवा सारा धनिचाकर झुंजती ।

दार वित्त घरदारं दिलें तरि मार चुकेना अती ।

फार वंदू मी काई वधिल्या हो गाई बाटविल्या द्विज सती ।

फंद मातलें धुंद आलि बेबंद बुडाली क्षिती ।

मद करिति मसलतीला मग फसली तिला नावरिता बळे भोगिती ।

पुंड घरोघरीं बंड कुणावर दंड कोण बांधिती ।

खंड कुणाचा घ्यावा कुणि द्यावा कुणि कुणाला किती ।

असा न कोणी पुसावयाला कसा काळ कशि मती ।

बसावया नच जागा मग पागा गजरथ बागा कुठें राहती ।

चिका आंत ज्या निक्या पढविल्या पिकाशिंगळ लाविती ।

विकावया त्या नेल्या किती मेल्या अबला उरल्या जन चुंबिती ।

फास गळ्यामधिं बांस पाठिवर लोह हाडा लाविती ।

मांस विप्र लोकांचे तोंकांचे वेचिति सांडस घेऊनि हातीं ।

न धीर वीर कां हंबीर होऊनी फकीर भिक मागती ।

चीर नसे हो अंगा किति सांगावा तो ताप जिवा लागती ।

हातें धरुनि देवता फोडिल्या लताराम भंगिती ।

गतायु किति झाले किति प्याले विष किति उरले सुख सेविती ।

किती सागर उदकें कुटुंबमह वाव्हले ।

किती दैवगतीनें काशीसही पावले ।

किती कर्नाटक देशांत धनिक धांवले ।

किती अब्रुचे जन तेथचि भांबावले ।

कैकांनी हिरेबचनाग कैफ चावले ।

किति उठाउठी भयभीत मरण पावले ।

किती ब्राह्मण गालही यवनानें चावले ।

कावले जन करितील कांगावले ।

अति सात्विक ते दुष्कर्मी सरसावले ।

किती फंद करिती ते बंदातचि घातले ।

काय समय हा लया रुद्र करि दया-दृष्टि झांकली भया ।

नका क्षिति झाली घरघाली रुद्र विशंती जगीं फांकली ॥१॥

रुसान कलिवर पुसा मनाला कसा काळ हा तरी ।

असा जनक्षय काहो कोणी पाहो संशय कथितों याचें वरीं ।

घराधीश कोणी, परास म्हणती करा पातकें बरीं ।

खराब जन निजकर्मे करिती अधर्म राजाची अफतरी ।

बाप तयाला ताप वृध्दपणी पाप पुत्र हा करी ।

शाप देतसे तोही म्हणे नोहे माझा वीर्यज हा तरी अरी ।

माय टाकिली पाय बांधुनि बायकोसि घे शिरीं ।

होय कशाशा बेटा तो पेटार्‍यातुनि साप काढिला वरी ।

सून बहिण सासु हे ह्मणति तिशी सुरत-वासना धरी ।

भवन बुडि पापानें मधुपानें मातुनि माय सुताला वरी ।

मनी धरुनि कामिनी मठामधि मुनि विनय चातुरी ।

जगी दाविती बावा परि आतुनि कावा भोदुनी खाती पुरी ।

लेश नसे उपदेश आपुला देश टाकुनि दूरी ।

केशवार्चन करती वरती परी आतूनी कर्मे नानापरी ।

असे धूर्त जे तूर्त जगांमधिं मूर्त पाप चवधरी ।

पुर्ती मुखादिक याची व त्याची कर्मे म्हणू नको ही खरीं ।
चित्तवित्त ठरिती निमित्त ठेवुनि चित्त अर्थ यावरी ।

मत्त धन्याशीं चोरी करिती अधिकारी दया कोठुन भूसुरीं ।

सती म्हणती निजपती त्यजुनि नांदती पराचे घरी ।

जिवें मारिता सरते त्यावर्ते दुसरे करिति कितिक सुंदरी ।

॥चाल॥

किती कन्याहयविक्रयें परम पातकी ।

एकाची कृती एकास करी घातकी ।

किती दुर्मतीनें गुरुपत्नीला हाटकी ।

किती जारण मारण उच्चाटन नाटकी ।

कितिकांची वाणी मृषा वहुनि हलकी ।

धनी यास पालखी चाकरास नालकी ।

कुणि विधवा ठेविती घरांमधिं पाणकी ।

मित्रास वंचिती मग कोठुन भावकी ।

अशी किति पापें जगी कुणा ठाउकीं ।

जरा कशास्तव करावयास्तव जरा मतीस झांकली ।

करा श्रवण हो याचें व्हायाचें ऐशी विधि वाणी भाकली ॥२॥

चिन्ह वाटतें भिन्न पुढति जें खिन्न जाहले मनीं ।

भिन्न देह किति करती किती भरती पोटें स्नाना कंटाळुनी ।

पहा कितिक जन महागाईनें दहा दिशा धुंडुनी ।

अहा शेवटीं मेले गेले यमलोकांशी गणावे कुणी ।

भणाण सारा दणाण झाला कणा न पावती सणीं ।

कुणास न मिळे भाजी कुणि राजी करडी मिळो आमडीं जुनी ।

मुरक चढती कुणी भूक म्हणती द्विज आधुक तशा ब्राह्मणी ।

क्रुकरी शाल शाला कुणी त्याला उभे राहूं न देती आंगणीं ।

कढी म्हणुनी कोणी वडी घालती उडी घालती अन्न पाहुनी ।

रडविताति किति पोरे किति ढोरें तैशि ओढिति दारांतुनी ।

पाक हो न हो हांक मारिती भाकर द्या म्हणवुनी ।

टाक मुखामधि कांहीं मज नाहीं म्हणती अन्न पंधरा दिनीं ।

जळें पिऊनी किती जलात फुगले पळात वपु त्यागूनी ।

गळा पडूनी किती रडती मरती बालक मुडदे कवटाळूनी ।

क्षुद्र इतर जे शुद्र तयांवरि रुद्र कोण या झणिं ।

मुद्रस कैचा त्याला भलत्याला भाकर मागति मुख पसरुनी ।

चणा भगर नाचणा एकादा धणा मिळे त्यांतुनी ।

उणा दिवाळी दसरा किती दुष्काळाचा घसरा घ्या पाहुनी ।

पीठ डाळ कुठ मीठ ढिगावरी नीट पडति जाउनी ।

धीट सोशिती कांहीं परि पाहि सोडित नच मेल्यावांचुनि ।

॥चाल॥

करतील काय हो अन्नाविण गांजलीं ।

ही दुनिया सारी जठराग्नींत भासलीं ।

नच माधुकरीला कोणी तदा लाजलीं ।

वेंचिती शितें चिखलांत रांड माजली ।

धनिकाची दौलत आपणांतच सामावली ।

शेवटीं विळे पळी दिवे लावणीं वाजलीं ।

यांवरी येऊनियां देवा कां गांजली ।

कैकांनी कुटुंबे विष पाजुनि निजविलीं ।

ही दुष्काळाची बरी नौबत वाजली ।

वर्णावी म्हणुनिया कवि मतीला लाजली ।

काठ कठिण दुष्काळ उडाला काळ रीति ठाकली ।

बाळ वृध्द लोकांही कुठें कांहीं तरीहो मर्यादा राहिली ॥३॥

सुधि म्हणति निरवधि काळ त्या मधिं दिड पायली ।

कधीं ऐकिलीं चिपटी कधिं निपट कोळवीं चोळवीं कधिं पाहिलीं ।

जुना जिन्नस वरी उणा वाट कुटे कुणांत पत राहिली ।

मणास रुपये तेरा तेलाला बारा तुपा शपत वाहिली ।

गूळ असो तोळाभर आहे कीं मूळ मिठा चीडली ।

खूळ लवंगा पैशाचा सवंगा मीरची पांच दिधली ।

हुजुरवाणी रुजू तराजू खजूरी एकली ।

खिजून घेती पैशा देतिल हो कैसा माखली नच जिभली ।

गहूं म्हणति जे बहू सवंग ते नऊ चिपटीं झालीं ।

मउ नवे जे दाणे बेदाणे झाले अशि दशा साहिली ।

मका रांडही आका हिला परिशिका कोठडी केली ।

नका द्वाड एरंडी हे रंडी आठ चिपटीं कधि ऐकिली ।

दुकाळ त्यामधीं बकाळ मंडळी ठकापरिस ठक भली ।

दुकान घालुनि बसती वरि दिसती निर्फळ घातुकता बाइली ।

नितळ सोनियां पितळ म्हणति निज पितळ पुतळि आटली ।

कुतळ बुडविले सारे ही वारे वेळची सराफावर लादिली ।

सार हिर्‍याला गार म्हणति सोनार देत पावली ।

चार शेर तांब्याला कां भ्याला म्हणे कांसार देत आधिली ।

पुढे काळ हा नुरे योग्यता विरे निघून चालली ।

आहे शालूच्या फर्दा चवलीचा खुर्दा काय गोष्ट चांगली ।

हे राहों भाजींत बागवान जोडका ।

पैशाचा एकचि मुळा एक दोडका ।

पैशास मक्याचा कंट एक मोडका ।

हा कांदा दो पैशांस एक बोडका ।

जळणास रुपया एक लहान खोडका ।

घोड्यांस शिपाई काय करिल बोडका ।

काळानें देश यापरि केला रोडाका ।

मग हत्यार राज उपाय काय थोडका ।

खाउनी नाबद म्हणों नये गोड कां ।

अजातरिपु हे प्रजा इत:पत मजा वृष्टि शिरकली ।

दुजा असुनि कविरायाच्या कृति येथुनि उरकली ४

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP