हरी वंचुनि नेला बाई । आतां करुं मी काई ।
अक्रुर कशाचा मेला । याने घातचि केला ।
बिन अपराधी हिरा नेला । नच पुसतां गेलां ।
हरविलां फ़ुलाचा झेला । यशोमतीचा चेला ॥१॥
बाई मसलत या कंसाची । कांहीं आहे साची ।
जळो रंडकी झाली त्या । मेल्याची त्या नेणार्याची ।
इतुक्यावर गती दैवाची । व्रजवासी जनाची ।
गाळांत फ़सविल्या गाई । उगी बसले बाई ॥२॥
आतां काय कुणाला पाहूं । हरिवांचुनी राहूं ।
कवणाचे सदनी बाहूं । किती विरह मी साहूं ।
यमुनेमधें ह्यासवें नाहु । कैचें सुख मी पाहुं ।
कविरायजीची किती । सांगूं मी भलाई ॥३॥