बाई नंदाचा मूल पहा किती तरि बेढंगी ॥ध्रु०॥
काय वदूं मूल माझी बगडी । काढून बाळी बुगडी ।
नहात होती घरीं उघडी । हा तिचे कुच रगडी ।
किति रांडाशी खेळे फ़ुगडी । फ़ेडितसे लुगडी ।
काय उणे नांदाया पृथ्विवरते । गांव सोडून द्यावे वाटते ।
या मेल्याचे नांव । काय म्हणून इथे रहावे । चालच बेढंगी ।
बाई नंदाचा मूल ॥१॥
माझ्या मथुरेची सुन धरली । ती काय कोणी दुरली ।
पाडुनी रंगामध्यें चुरली । आतां काय रीत उरली ।
अग याच्या हातींची मुरली । ती तर विषें भरली ।
भलि बुरी बायको ठेवितसे उरिं हात ।
हे कां सोशिल वाउगें भली मुलीची जात ।
कुठवर याचे कर्म साहावे सगळें व्रत भंगी ।
बाई नंदाचा मूल ॥२॥
या पापाची कुठें झडती । देईल हा पुढती ।
अजून माझी मुलं रडती । दिननिशीं घरिं पडतीं ।
याच्या नांवानें चरफ़डतीं । भलतेंच बडबडतीं ।
गोकुळ नगरीं मातला बाई गवळ्याचा पोर ।
यानें आम्हा बुडविलें खोटा मेला चोर ।
कविरायाला स्वतनु वाहा मग शिरला रंगी
बाई नंदाचा मूल ॥३॥