भला जन्म हा तुला लाधला खुलास ह्रदयीं बुधा ।
धरिसी तरि हरिचा सेवक सुधा ॥ध्रु०॥
चराचरीं गुरु तरावयाला नरा शिरांवरि हरि ।
जरा तरि समज धरी अंतरी ॥
हटातटाने पटा रंगवुनि जट धरिशि कां शिरी ।
मठाची उठाठेव कां तरी ॥
वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावे परी ।
हरीचें नांव भवांबुधी तरी ॥
काय गळ्यांत घालुनि तुळशीची लांकडे ।
ही काय भवाला दूर करितिल माकडें ।
बाहेर मिरविशी आंत हरिशी वांकडे ।
अशा भक्तिच्या रसा-रहित तूं कसा म्हणविशी बुधा ।
हरिरस सांडुनि घेसी दुधा ॥ ॥भला१॥]
जाळ गळ्यामधिं माळ कशाला व्याळ काय कोपला ।
आंतुनि बाहेर म्हणविशी भला ॥
वित्त पहातां पित्त येतसे चित्त पाहिजे मला ।
असे हरि म्हणतो नुमजे तुला ॥
दांभिक वर संभावित अभ्यंतरी नाहिस बिंबला ।
बहिर्मुख नर नरका लाधला ॥
तूं पोटासाठी करि खटपट भलतिशी ।
परि भक्ति रसाविण हरि भेटेल काय तुशी ।
काय मौन धरुनिया गोमुखिला जाळिशी ।
स्वार्थ सुखें परमार्थ बुडविला अनर्थ केला मुग्धा ।
न जाणसि कांजी म्हणसी सुधा । ॥भला२॥
टिळा टोपिवर शिळा पडो या बिळांत करिसी जपा ।
तथापि न होय हरीची कृपा ।
दर्भ मुष्टिच्या गर्भि धरुनियां निर्भर पशुची वपा ।
जाळिशी तिळा तांदुळा तुपा ।
दंडकमंडलु बंड माजविशी मुंड मुंडिशी तपा ।
न सार्थक लट्क्या सार्या गपा ॥
ही बारबार तलवार येईल काय पुन्हां ।
ह्या दुर्लभ नरदेहांत ठेविशी कुण्हा ।
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा ।
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा ।
सदा हरि कविरायावर फ़िदा । भला जन्म हा तुला ॥३॥