मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
उध्दवजी मधुवनीं ॥ फ़ट ...

रामजोशी - उध्दवजी मधुवनीं ॥ फ़ट ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


उध्दवजी मधुवनीं ॥

फ़ट फ़ट फ़ट फ़ट बटकिसी रतला हरि तरि काय समजुनी ॥ध्रु०॥

आतां काय म्हणावें तरी ॥

कुचकुचकुच जन बोलत गाई थुंकत तोंडावरी ।

तिचि याची कांहि तरी सरी ॥

कोण कुळ आपुलें बटकुर धरिलें उरीं ।

अबरुच नाहीं तिळभरी ॥

कुठकुठ सुधा राहिना अशि काय सौदेगिरी ।

आम्ही काय जाणों याची परी ॥

पट पट पट पट आणा वाहिल्या येतो म्हणून गेला हरी ।

अपयश केवढें शिरीं ॥

खळ खळ खळ खळ रडतों रे आम्ही प्राणच देऊं यावरी ।

अशी काय कुबडी निकी ।

जातिची होऊन रांड फ़िकी ।

याणें घ्यावी काय तिची लाथ बुकी ।

अशि काय मना आलि तरी हुकी ।

ही कशी हो लहान चुकी ।

शिव शिव शिव शिव कुब्जा संगतीनें बरे म्हणतिल काय कुणी ॥

उध्दवजी म० ॥१॥

आठां ठायीं रांड वाकडी ।

कशि कशि कशि कशि लाज नुपजली त्याला वाटली फ़ांकडी ।

आम्ही तरि आलों आतां रडी ॥

यानें यानें यानें यानें बटकर धरिलें तिकडेच दिधली बुडी ।

याला जाली तिची आवडी ।

किति किति किति किति मरतो आम्ही परि हरी कुब्जेचा गडी ।

कुठे होती रांड खेबडी ।

नको नको नको नको असें वाटतें यमुनेत घ्यावी उडी ।

बटकिची काय परवडी ।

लगबग लगबग करिल आतां तिची वेणी फ़णी मुद राखडी ।

आतां काय हरि येतो पुन्हां ।

हे कळलेंच आमच्या मना ।

उगी तळमळ जिव राहिना ।

त्याची मसलत कांहीं समजेना ।

त्या सवतीनें गुंतविले म्हणा? ।

चर चर चर चर गळा कापिला कुठें होती रांड केरसुणी ॥

॥उध्द० ॥२॥

आता काय सांगूं याला ।

पुरे पुरे पुरे पुरे योग कशाचा भोगचि हा पातला ।

तुम्ही तरि सांगा त्याला ।

जिक जिक जिक जिक दु:ख पिकविलें योग यदुवरचि मिळविला ।

वंचुनिया मायबापाला ॥

गेला गेला गेला गेला त्याला काय आम्ही जो बटकीस भांबावला ।

कांहिं तरी लाज कपट्याला ॥

धिक धिक धिक धिक जळो जिंदगानी गाई काय म्हणु हरि रातला ।

कशी भूल पडली त्याला ॥

झुरु झुरु झुरु झुरु पंजर झालो कांहि नये ममता तिला ।

कोण खडखड रांड बटकीची ।

(याने तनु उजरावि कां तिची)

रति सोडून शुभ गरतीची ।

बरि मिळाली खुपसुरतीची ।

आतां कशि होते मति परतिची ।

कुठे होती रांड केरसुणी कशि भरली याचे मनीं ।

जिचें नांव घेईना कुणी ।

हर हर हर हर शिवा पाही तूं वहिवाट मोडूं नये जुनी ॥

॥उध्द० ॥३॥

कुठं होती रांड पोटजळी ।

चर चर चर चर गळा कापिला बसलिच आमुचे मुळीं ।

आतां जरि येती गोकुळीं ।

कर कर कर कर चावुनी खातो तिच्या नरड्याची नळी ।

देखत लंगडी खुळी ।

उचलून द्या ना सुळी ।

गुज गुज गुज गुज सांगुनी तिसीं खलबत करी गोकुळीं ।

गोकुळ सगळें गिळी ।

तळ तळ तळ तळ तळमळतो जसि जलविरहित मासुळी ।

बुडवून आमुची कुळी ।

दुडु दुडु दुडु दुडु धांवत गेला तिच्या उतरला तिळीं ।

आतां राहिल अब्रु कशी ।

अशि कां याणे बाळगिली मिशी (?) ।

कोण धांगड रांड घरघुशी ।

जिची मळकट वाकळ उशी ।

तिजवरता माधव खुशी ।

कविरायाची समजुत येईना मनीं । उध्दवजी मधुवनीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP