ब्रह्मादिक चकले काय इतरांचा केवा)
या नंदनंदने फटफट मन विटविलें ।
खाऊंनिया चटमट दधिघट दुध लुटविले ॥ध्रु०॥
कांहीं बोल बोलता नये हाकिमाच्या मुळें ।
गांवांत मातले धुंद पोर गोवळे ।
बाई दिसे लहान मूल अति निपट कोवळें ।
अंगाला झोंबे लोटुन देतो बळें ।
आतां काय करावें बाई टपतो सारे वेळे ।
हा कलंक लाऊनि बुडविल दोन्ही कुळें ।
ह्याच्या हातची मुरली कधी गे जाइल जळून ।
या सटवीनें घेतलेचि तनमन पिळून ।
कशी घरघाली रांड बसली आम्हां गिळून ।
आता काय करावें कोणीकडे जावे पळून ।
चल नंदापाशी अवघ्या जाऊं मिळून ।
किती कटकट वटवट कपाळ नित्य उठविलें ।
गोपीचे वृंदची वृंदावनी पटविले । या नंदनंदने ॥१॥
नव्या तरण्या मुलगीस मटकन धरी मनगटीं ।
तोडितो झोंबुनि हार घटित कुचतटी ।
याची किती वेळा बाई म्या सोसावी अटी ।
याची इतकी कां गा ही तरी मजवर बळकटी ।
जेव्हां तेव्हां अडविता घरींच पाहुन एकटी ।
याची किती वेळा म्या धरलीसे हनुवटी ।
असे विनविले बहुपरी पडला माझे झटी ।
हा ढंग सोडिना गुण उधळिले शेवटी ।
कांहीं बाई बरे नाहीं यांच्या संगतीनें मन गेलें विटून ।
या ग या नगरीचे झाले कोळसे आम्ही ग जाऊ उठून ।
ही चट याला याची माझी मर्जीच गेली तुटून ।
असा यशोमतीच्या पोटीम दुष्ट जन्मला कुठून ।
झाला नगरीचा धनी तरी नेईल काय घरदार लुटून ।
यानें गरतीचें कुळ बाई अबरुतूनी उठविलें ।
काल दिसा दुपारा एका मुलीस पटविलें । या नंदनंदने ॥२॥
अशी यदुपतीला जी विनवित होती गोपिका ।
ती कोणी एक दिनीं म्हणे पतीला जा दहिदुध विका ।
अहो नंदाचा मूल भेटेल त्या भिऊं नका ।
धरा बळकट मी सूड घेईन मी नावाची बका ।
गेला गौळी आला हरी त्यावाणी सन मी चुका (?)
म्हणे गोरस विकला ठीक साधिला रुका ।
परी शिणले गे फ़िरता हातपाय गेले थकून ।
चल घरांत म्हणतां उठली सुंदरी तिथून ।
ती होती सावध परी निजपति म्हणे गेली चुकून ।
भ्रमरानें भोगिली जशी कमळिणी गेली सुकून ।
कधीं यदुपतीच्या या तुर्यास कुणी हटविलें ।
कविराय म्हणे कलगीस दुर पिटविलें । या नंदनंदनें ॥३॥