१४४
ऐसें आहे सर्व कांहीं । चिरंजीव कांहीं नाहीं ॥१॥
युक्ति जाते बुद्धि जाते । क्रिया तेहि पालटते ॥२॥
धीर विचार बुडाला । विवेक होता तोही गेला ॥३॥
रामीरामदास म्हणे । वृद्ध पणाचीं लक्षणें ॥४॥
१४५
वेगीं होई सावधान । ऐसें आहे वृद्धपण ॥१॥
डोळे जाती कान जाती । दंत अवघेचि पडती ॥२॥
हात गेले पाय गेले । देहा पाझर लागले ॥३॥
दास म्हणे शक्ति गेली । मति अवघीच उडाली ॥४॥
१४६
देह हें असार कृमीचें कोठार । परी येणें सार पाविजेतें ॥१॥
लागवेग करीं लागवेग करीं । स्वहित विचारीं आलया रे ॥२॥
देहसंगें घडे संसारयातना । परी हा भजनमूळ देहो ॥३॥
देहाचेनि संगें हिंपुटी होईजे । विचारें पाविजे मोक्षपद ॥४॥
जन्मासी कारण मूळ देहबुद्धि । परी ज्ञानसिद्धि देहसंगें ॥५॥
देहसंगें वाटे स्वयें अभिमान । आणि समाधान देहसंगें ॥६॥
देहसंगें उठे स्वयातीमत्सर । आणि पैलपार देहसंगें ॥७॥
देहसंगें जीव होतसे चांडाळ । आणि पुण्यशीळ देहसंगें ॥८॥
देहसंगें प्राणी अधोगति जाती । आणि धन्य होती देहसंगें ॥९॥
देहसंगें बद्ध देहसंगें मुक्त । देहसंगें भक्त होत असे ॥१०॥
देहसंगें देव आणि भावाभाव । पाप पुण्य सर्व देहसंगें ॥११॥
देहसंगें वृत्ति होतसे निवृत्ति । गती अवगति देहसंगें ॥१२॥
देहसंगें भोग देहसंगें रोग । देहसंगें योग साधनाचा ॥१३॥
देहसंगें देही विदेही संसारीं । सद्भाव अंतरीं देहसंगें ॥१४॥
देहसंगें तारी देहसंगें मारी । संतसंग धरी देहसंगें ॥१५॥
देहसंगें गती रामदासीं जाली । संगति जोडली राघवाची ॥१६॥
१४७
देह बहुतांचें खाजें । मूर्ख म्हणती माझें माझें ॥१॥
विंचु विखारें अजगरें । नाना श्वापदें अपारें ॥२॥
नाना पक्षी गीध काक । श्वान मार्जार जंबुक ॥३॥
लाव लासी भुतेंखेतें । सांगों जातां असंख्यातें ॥४॥
किती सांगावा विस्तार । जीव जीवाचा आहार ॥५॥
म्हणे रामीरामदास । कैंचा देहाचा विश्वास ॥६॥
१४८
देहीं आरोग्य चालतें । भाग्य नाहीं यापरतें ॥१॥
लाहो घ्यावा हरिभक्तीचा । नाहीं भरंवसा देहाचा ॥२॥
देह आहे क्षणभंगुर । तुम्हीं जाणतां विचार ॥३॥
रामीरामदास म्हणे । अकस्मात लागे जाणे ॥४॥
१४९
घात करुनि आपुला । काय रडशील पूढिलां ॥१॥
बहुत मोलाचें आयुष्य । विषयलोभें केला नाश ॥२॥
नाहीं ओळखिलें सत्या । तेणें केली ब्रम्हहत्या ॥३॥
नरदेहाची संगती । गेली गेली हातोहातीं ॥४॥
नाहीं देहाचा भरंवसा । गेली गेली रे वयसा ॥५॥
रामीरामदास म्हणे । भुलों नको मूर्खपणें ॥६॥
१५०
देहा सुख योगी दे तो भवरोगी । राम तयालागीं प्राप्त कैंचा ॥१॥
देहा सुख जालें मन तें रंगलें । समाधान गेलें हरपोनी ॥२॥
देहा सुख देतां ज्याची त्याला चिंता । सांकडें अनंता पडेना कीं ॥३॥
देहा सुख देणें लोभाचेनि गुणें । मग नारायण पाविजेना ॥४॥
रामीरामदास सर्वस्वें उदास । त्याला जगदीश विसंबेना ॥५॥
१५१
थोटे पांगुळ बधिर । अधांतरीं होती नर ॥१॥
नाहीं देहाचा भरंवसा । शरण जाई जगदीशा ॥२॥
कोडी कुश्चिळ सर्वांगीं । एक जाले क्षयरोगी ॥३॥
एक प्राणी अंध होती । एका समंध लागती ॥४॥
नाना रोगांचे उमाळे । काय होईल तें न कळे ॥५॥
रामदास म्हणे भावें । वेगीं सार्थक करावें ॥६॥
१५२
शीत काळींच हुताश । उष्णकाळीं वारावास ॥१॥
आले पर्जन्याचे दिवस । केले घराचे सायास ॥२॥
नाना व्याधींचीं औषधें । पथ्य करावें निरोधें ॥३॥
विषयीं जनांसि आदर । करणें लागे निरंतर ॥४॥
अवघा धंदाचि लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
दास म्हणे सांगों किती । ऐसी देहाची संगती ॥६॥
१५३
ऐसा देह जाण तो नव्हे भूषण । याचा अभिमान कामा नये ॥१॥
देहसंगें नाना अलंकार भूषणें । होताती मळिणें दिव्यांबरें ॥२॥
नाना परिमळ देहासी लावितां । क्षणां पाहों जातां घाणी सुटे ॥३॥
देहसंगें शुद्ध भागिरथीचें जळ । होतसे तत्काळ लघुशंका ॥४॥
अन्न ब्रम्ह ऐसें बोलती सकळ । त्याचा होय मळ देहसंगें ॥५॥
अन्न हें निर्मळ देहीं सांठवितां । क्षणां पाहों जातां ओक जाला ॥६॥
देहाचा संबंध ज्ञानियां लागला । तेणें ज्ञानी जाला अभिमानी ॥७॥
देहाच्या संबंधें सत्य हारपलें । मिथ्या तेंचि जालें साच ऐसें ॥८॥
देहाचा संबंधु संदेह उठवी । जन्ममृत्य दावी सर्वकाळ ॥९॥
देहाचा सबंधु एकसरां सुटे । जरी भाग्यें भेटे संतजन ॥१०॥
संतजन तोडी देहाचा संबंधु । रामदासीं बोधु निर्गुणाचा ॥११॥