मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


६३१.
सुखाचे सांगाती सर्वहि मिळती । दुःख होतां जाती निघोनियां ॥१॥
निघोनियां जाती संकटाचे वेळे । सुख होतां मिळे समुदाव ॥२॥
समुदाव तंव देहाचे संबंधी । तुटली उपाधी रामदासी ॥३॥

६३२.
संसारी तळमळ । सोडीना मायाजाळ ।
लागते हळहळ । सर्वकाळ रे ॥ध्रु०॥
नेणतां दयाळ राम । पोसिला सकळ काम ।
तयासि विश्राम । नाही नाही रे ॥१॥
रामीरामदास म्हणे । देहदुःखाचेनी गुणे ।
सावधान होणे । भक्तिलागी रे ॥२॥

६३३.
सेवकास भाग्य चढे । त्याआधीन होणे घडे ॥१॥
देव करील ते साहावे । काय होईल ते पहावे ॥२॥
वर्तमान घडे जैसे । तै उगेचि व्हावे तैसे ॥३॥
दास म्हणे वेळ कैसी । राज्य जाहले कळीसी ॥४॥

६३४.
पोटधंदा जन्मवरी । करुं जातां नाही पुरी ॥१॥
करितां संसार सायास । नाही क्षणाचा अवकाश ॥२॥
अन्न निर्माण कराया । सर्वकाळ पीडी काया ॥३॥
काम करितां दिवस थोडा । ऐशा कष्टा नाही जोडा ॥४॥
अवघा धंदाचि लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
दास म्हणे सावधान । जाले सदृढ बंधन ॥६॥

६३५.
धनाधान्याचे संचित । करणे लागे सावचित्त ॥१॥
अर्था जातो एकला रे । कलह करावे आदरे ॥२॥
नाना पशू ते पाळावी । नाना कृत्ये सांभाळावी ॥३॥
सार विचार जतन । करणे लागे सावधान ॥४॥
अवघा धंदाचि लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
रामदास म्हणे देवा । जीव किती हा घालावा ॥६॥

६३६.
पहा कलियुगीचे जन । कैसे अवघेचि सज्जन ॥१॥
आप्तपणे मारुं जातां । त्यास वाटे परम व्यथा ॥२॥
पाव देतां मानेवरी । सुखे डोळेचि वटारी ॥३॥
रामदास म्हणे मूर्ख । नेणे पराव्याचे दुःख ॥४॥

६३७.
आम्ही देवाचे आळशी । काही नलगे आम्हांसी ॥१॥
गोडगोडसे जेवणे । आठां दिवसां एक न्हाणे ॥ध्रु०॥
मऊ पलंग सुपोती । निद्रा पाहिजे पुरती ॥२॥
दास म्हणे लाभेंविण । करुं साक्षेपे भांडण ॥३॥

६३८.
अन्न व्हावे पोटभरी । मग ते ज्ञानचर्चा बरी ॥१॥
ऐसे बोले ते अज्ञान । जया नाही समाधान ॥२॥
आधी अन्न तो पाहिजे । मग ध्यानस्थ राहिजे ॥३॥
अन्नाविणे तळमळ । अन्नाकरितां सकळ ॥४॥
कैचा राम कैचा दास । अवघे पोटाचे सायास ॥५॥

६३९.
भक्ति नलगे भाव नलगे । देव नलगे आम्हांसी ॥१॥
आम्ही पोटाचे पाईक । आम्हां नलगे आणिक ॥२॥
आम्ही ज्यांची खाऊं रोटी । त्याची कीर्ति करुं मोठी ॥३॥
रामीरामदास म्हणे । ऐसे मूर्खाचे बोलणे ॥४॥

६४०.
आम्हां अन्न जाले पुरे । अन्नावीण काया नुरे ॥१॥
पोटभरी मिळे अन्न । आम्हां तेंचि ब्रह्मज्ञान ॥२॥
अन्नावांचूनि दुसरा । देव कोण आहे खरा ॥३॥
भगवंताची नाही गोडी । काय म्हणे ते बराडी ॥४॥
रामीरामदास म्हणे । मूर्ख बोले दैन्यवाणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP