विविध विषय - अर्चन
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
अर्चन.
५८४.
पूज्य देवाची प्रतिमा । त्याची न कळे महिमा ॥१॥
देव भक्तांचा विश्राम । त्यासी नेणे तो अधम ॥२॥
नाना स्थाने भूमंडळी । कोणे सांगावी आगळी ॥३॥
ज्याचे चरणीचे उदके । धन्य होती विश्वलोके ॥४॥
ज्याची चरित्रे ऐकतां । जनी होय सार्थकता ॥५॥
रामीरामदास म्हणे । धन्य होइजे स्मरणे ॥६॥
६.
वंदन.
५८५.
प्रेमाचिया सन्निधाने । देव आले साभिमाने ॥१॥
आतां आनंद आनंद । देवा भक्ता नाही भेद ॥२॥
मुख्य पूजा परंपरा । केला दासासी अधिकारा ॥३॥
दास पाऊले वंदितो । सदा सन्निध राहतो ॥४॥
७.
दास्य.
५८६.
कोणीएके आधी देवासी भजावे । तेणे पडे ठावे सर्व कांही ॥१॥
सर्व कांही चिंता देवचि करितो । स्वये उद्धरितो सेवकांसी ॥२॥
सेवकांसी काय कळे देवेविण । साधनाचा शीण वाउगाची ॥३॥
वाउगाची शीण हे आले प्रचीती । देव आदि अंती सांभाळितो ॥४॥
सांभाळितो देव तेथे जाला भाव । देवचि उपाव साधकांसी ॥५॥
सेवकांसी कांही न चले उपाय । दाखविली सोय साभिमाने ॥६॥
५८७.
आपुल्या भजने पोटहि भरेना । लागे उपार्जना दुसर्याची ॥१॥
दुसर्याची सेवा करितां वेतन । पाविजेतो अन्न लोकांमध्ये ॥२॥
लोकांमध्ये उपासितां देह दारा । मागावा मुशारा कोणापाशी ॥३॥
कोणापाशी कोणे काय हो सांगावे । कैसेनि मागावे वेतनासी ॥४॥
वेतनासि जनी तरीच पाविजे । जरी सेवा कीजे स्वामियाची ॥५॥
स्वामियाची सेवा करितां उत्पन्न । स्वामी सुप्रसन्न होत असे ॥६॥
होत असे देव संतुष्ट भजतां । मुक्ति सायुज्यता तेणे लाभे ॥७॥
लाभे नवविधा तेणे चुके चतुर्विधा । पुसावे सुबुद्धां सज्जनांसी ॥८॥
सज्जनांसी पुसा देहासी भजतां । भार भगवंता कैसा पडे ॥९॥
कैसा पडे भार देहाच्या भजने । भक्तिचेनि गुणे देव पावे ॥१०॥
देव पावतसे भजतां देवासी । सेवितां देहासी देव कैंचा ॥११॥
देव कैंचा देव सेविल्यावांचोनी । तत्त्वविवंचनी दास म्हणे ॥१२॥
५८८.
लोभा नवसांचा तो देव बद्धांचा । आणि मुमुक्षांचा गुरु देव ॥१॥
गुरु देव जाण तया मुमुक्षांचा । देव साधकांचा निरंजन ॥२॥
निरंजन देव साधकांचे मनी । सिध्द समाधानी देवरुप ॥३॥
देवरुप जाला संदेह तुटला । तोचि एक भला भूमंडळी ॥४॥
भूमंडळी रामदास्य धन्य आहे । अनन्यता पाहे शोधूनियां ॥५॥
५८९.
राम कैसा आहे हे आधी पहावे । मग सुखेनावे दास्य करुं ॥१॥
दास्य करुं जन देव वोळखेना । जाले ब्रह्मज्ञान दास्य कैसे ॥२॥
दास्य कैचे घडी देवासी नेणतां । वाउगे शिणतां श्रम उरे ॥३॥
श्रम उरे साध्य ते कांही दिसेना । अंतरी वसेना समाधान ॥४॥
समाधान देव पाहतां घडेल । येर विघडेल दास म्हणे ॥५॥
५९०.
जो जो भजनासी लागला । तो तो रामदास झाला ॥१॥
दासपण रामी वाव । रामपणा कैंचा ठाव ॥२॥
आदिकरुनि तिन्ही देव । सकळ आहे भक्तिभाव ॥३॥
रामी राम तोहि दास । भेद नाही त्या आम्हांस ॥४॥
रामदास्यकरुनि पाहे । सर्व सृष्टि चालताहे ॥५॥
प्राणिमात्र रामदास । रामदासी हा विश्वास ॥६॥
५९१.
दिनानाथाचे सेवक । आम्ही स्वामींहुनी अधिक ॥१॥
शरणांगत राघवाचे । परी शरण दारिद्राचे ॥२॥
जे जे देवासे दुःसह । ते ते आम्हां सुखावह ॥३॥
रामीरामदास म्हणे । रामकृपेचेनि गुणे ॥४॥
५९२.
दासाची संपत्ति राम सीतापति । जीवाचा सांगाती राम एक ॥१॥
राम एक माता राम एक पिता । राम सर्व भ्राता सहोदरु ॥२॥
सहोदरु विद्या वैभव कांचन । सर्वही स्वजन राम एक ॥३॥
राम एक स्वामी रामचि कैवारी । लाभ तो संसारी राम एक ॥४॥
राम एक ज्ञान राम एक ध्यान । रामे समाधान रामदासी ॥५॥
५९३.
ब्रीद साच केले भक्तां उद्धरीले । प्रचितीस आले मनाचिये ॥१॥
मनाची प्रचिती जाली निर्वासना । लेशहि असेना विषयांचा ॥२॥
विषयांचा लेश संसारदायक । जानकीनायक चुकवितो ॥३॥
चुकवितो जन्ममृत्यु सेवकांचा । विचार हा काचा कदा नव्हे ॥४॥
कदा नव्हे कांही वाक्य अप्रमाण । धरावे चरण राघवाचे ॥५॥
राघवाचे दास सर्वस्वे उदास । तोडी आशापाश देवराणा ॥६॥
देवराणा भाग्ये जालियां कैपक्षी । नाना परी रक्षी सेवकासी ॥७॥
सेवकासी कांही नलगे साधन । करीतो पावन ब्रीदासाठी ॥८॥
ब्रीदासाठी भक्त तारिले अपार । आतां वारंवार किती सांगो ॥९॥
किती सांगो देव पतितपावन । करावे भजन दास म्हणे ॥१०॥
५९४.
रानी वनी मनी राम असो द्यावी । करील कुडावा सेवकांचा ॥१॥
सेवकांचा भार घेतसे साचार । म्हणोनी अंतर पडो नेदी ॥२॥
पडो नेदी शब्द माझा भूमिवरी । दृढ चित्ती धरी देवराणा ॥३॥
देवराणा सर्वां देवां सोडविता । लागईल चिंता त्यासी तुझी ॥४॥
तुझी चिंता करी राव आयोध्येचा । कृपाळु दीनांचा दास म्हणे ॥५॥
५९५.
कायावाचामने यथार्थ रामी मिळणे । तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य ॥१॥
कामक्रोध खंडणे मदमत्सर दंडणे । तरी० ॥२॥
परस्त्रीनपुंसक होणे परद्रव्ये पोळणे । तरी० ॥३॥
जैसे मुखे बोलणे तैसी क्रिया चालणे ॥ तरी० ॥४॥
मायानिवर्तक ज्ञाने ज्ञेयचि पै होणे । तरी० ॥५॥
रामदास म्हणे निर्गुण सुख लाधणे । तरी० ॥६॥
५९६.
आमुचे वंशी आत्माराम । एका पिंडीचे निष्काम ॥१॥
रामदास्य आले हाता । अवघा वंश धन्य आतां ॥२॥
बापे केली उपार्जना । आम्ही लाधलो त्या धना ॥३॥
बंधु अभिलाषा टेकला । वांटा घेऊनि भिन्न जाला ॥४॥
पोर सकळां संकोचले । एकट सुखी उधळले ॥५॥
रामीरामदासे स्थिति । पाहिली वडिलांची रीति ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 26, 2011
TOP