मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नामस्मरण.

विविध विषय - नामस्मरण.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


५४३ .

प्रातःकाळ जाल्या राम आठवावा । हृदयी धरावा क्षण एक ॥१॥

क्षण एक राम हृदयी धरिजे । संसारी तरिजे हेळामात्रे ॥२॥

हेळामात्रे रामनामे होय गती । भाग्यवंत घेती सर्वकाळ ॥३॥

सर्वकाळ राम मानसी धरावा । वाचे उच्चारावा नामघोष ॥४॥

नामघोष वाचे श्रवण कीर्तन । चरणी गमन देवालया ॥५॥

देवालयां जातां सार्थक जाहाले । कारणी लागले कळेवर ॥६॥

कळीवर त्वचा जोडूनी हस्तक । ठेवावा मस्तक रामपायी ॥७॥

रामपायी शिळा जाली दिव्य बाळा । तैसाचि सोहळा मानवांसी ॥८॥

मानवांसी अंती रामनामे गती । सांगे उमापति महादेव ॥९॥

महादेव सांगे जप पार्वतीस । तोचि तो विश्वास रामदासी ॥१०॥

५४४ .

गाइलेचि गावे जीवे सर्वभावे । तेंचि ते म्हणावे रात्रंदिवस ॥१॥

रात्रंदिवस नाम तेंचि ते मागुते । आवडी स्वहित गात जावे ॥२॥

गात जावे परि वीट मानूं नये । दास म्हणे सोय राघवाची ॥३॥

५४५ .

यादवा माधवा ध्याई रे साधवा । काळ तो आघवा न पवेचि ॥१॥

नारायण ऐसे करी पारायण । तेणे तूं कारण पावशील ॥२॥

हरी हरी ऐसे जपशील जरी । तो हरि उतरी भवसिंधु ॥३॥

जपे रे वामना पुरती कामना । व्यर्थ तूं कां मना हिंडवीसी ॥४॥

केशवा केशवा ध्यास असो द्यावा । संसाराचा गोंवा तुटईल ॥५॥

गोविंदा गोविंदा हाचि बरा धंदा । तुटती आपदा दास म्हणे ॥६॥

५४६ .

श्रीहरि श्रीहरि बोलावे वैखरी । पातकासि उरी आढळेना ॥१॥

ध्याई त्रिविक्रम चुकवील श्रम । तेणे तूं विश्राम पावशील ॥२॥

विष्णूचे चिंतन वैष्णव करिती । तेणे उद्धरती संसारी ॥३॥

मधुसूदन हा भक्तवेळाईत । तयावरी चित्त असो द्यावे ॥४॥

वासुदेव सर्व लोकी वास करी । अखंड वैखरी नाम त्याचे ॥५॥

त्रिविक्रम जगविक्रमचि देतो । पातकासि नेतो रसातळा ॥६॥

रामदास म्हणे अनंत नामाचा । देव हा नेमाच आठवावा ॥७॥

५४७ .

अनंत पाहतां अनंत होईजे । चिंतने पाविजे मोक्षपद ॥१॥

पद नाही तेथे विरंची जन्मला । स्मरावे तयाला निरंतर ॥२॥

दामोदर करी जनाचा उद्धार । ते नामी निर्धार असो द्यावा ॥३॥

संकर्षण देतो जनांसी अशन । होय निरसन आपदांचे ॥४॥

प्रद्युम्न तो मनी आठवीत जावा । कोणीएक गोंवा पडो नेदी ॥५॥

शुद्ध मने अनिरुद्धाचे चिंतन । तेणे अनुमान दुरी होतो ॥६॥

ज्याची नामे त्याची रुपे ओळखतां । होय सार्थकता दास म्हणे ॥७॥

५४८ .

ध्याईं पुरुषोत्तम होसील उत्तम । मग तुझा श्रम नासईल ॥१॥

अधोक्षज ऐसे नारसिंह म्हणा । संसारासी जिणा सुखे नावे ॥२॥

अच्युत चेवेना त्यास ध्यायी मना । पुढे जनार्दना पावशील ॥३॥

उपेंद्र म्हणतां इंद्रचि होइजे । सार्थकचि कीजे सर्व कांही ॥४॥

आठवितां कृष्णा तुटतील तृष्णा । सोडी भवउष्णापासुनियां ॥५॥

ध्यायी पांडुरंग होई सर्व रंग । नासेल विरंग सर्व कांही ॥६॥

ध्यायी जगन्नाथ होशील सनाथ । देव कोण अर्थे समजावा ॥७॥

५४९ .

धाकटाचि धुरु तो नव्हे लेंकरुं । जया सर्वेश्वरु प्रगटला ॥१॥

प्रगटला देव तया उपमन्या । भावार्थे अनन्या क्षीरसिंधु ॥२॥

क्षीरसिंधुवासी स्वये नारायण । प्रल्हादा रक्षण करीतसे ॥३॥

करितो रक्षण दासासी संकटी । त्याचे नाम कंठी असो द्यावे ॥४॥

असो द्यावे मनी देवाचे चिंतन । गजेंद्र पावन नाम घेतां ॥५॥

५५० .

सोपे सुगम हे नाम राघवाचे । सर्वकाळ वाचे येवो द्यावे ॥१॥

येवो द्यावे वाचे नाम निरंतर । तेणे हा संसार तरिजेल ॥२॥

तरिजेल रामीरामदास म्हणे । सावधान होणे रामनामी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP