विविध विषय - आत्मनिवेदन
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
६०२.
पुण्य हे भोगावे सर्वांचे अंतरी । पापाची सामुग्री कोण भोगी ॥१॥
कोण भोगी बापा केली तुझी कर्मे । मागे देवधर्म वाळिलासी ॥२॥
वाळिलासी आतां दिससी बापुडा । भक्ति करी मूढा राघवाची ॥३॥
राघवाची भक्ति करी यथाशक्ति । पावशील मुक्ति सायुज्यता ॥४॥
सायुज्यता मुक्ति आत्मनिवेदने । सद्गुरुवचने दास म्हणे ॥५॥
६०३.
राजा सांडुनीया प्रजांचा सेवक । त्यासि कोणी एक रागिजेल ॥१॥
रागेजेना कोणी राव वोळगतां । तैसे भगवंता वोळगावे ॥२॥
वोळगावे भावे देवा निर्गुणासी । भजतां गुणासी नाश आहे ॥३॥
नाश आहे गुणा पहावे निर्गुणा । योगियांच्या खुणा ओळखाव्या ॥४॥
ओळखतां खुण श्रवणमनने । आत्मनिवेदने दास म्हणे ॥५॥
६०४.
आत्मनिवेदन नववे भजन । येणे संतजन समाधानी ॥१॥
समाधानी संत आत्मनिवेदने । ज्ञाने मीतूंपण सांडवले ॥२॥
सांडवले सर्व मायिक संगासी । रामीरामदासी निःसंगता ॥३॥
निःसंगता जाली विवेकाने केली । मुक्ति हे लाधली सायुज्यता ॥४॥
६०५.
रुप रामाचे पाहतां । मग कैंची रे भिन्नता ॥१॥
दृश्य अदृश्यावेगळा । राम जीवींचा जिव्हाळा ॥२॥
वेगळीक पाहतां कांही । पाहतां मुळींच रे नाही ॥३॥
रामदासी राम होणे । तेथे कैचें रे देखणे ॥४॥
६०६.
करीं घेतां नये टाकितां न जाये । ऐसे रुप आहे राघवाचे ॥१॥
राघवाचे रुप पाहतां न दिसे । डोळां भरलेसे सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ भेटि कदा नाही तुटी । रामदासी लुटी स्वरुपाची ॥३॥
६०७.
माझा स्वामी आहे संकल्पापरता । शब्दी कैसी आतां स्तुति करुं ॥१॥
स्तुति करुं जातां अंतरला दुरी । मीतूंपणा उरी उरो नेदी ॥२॥
उरो नेदी उरी स्वामीसेवकपण । एकाकी आपणाऐसे केले ॥३॥
केले संघटण कापुरे अग्नीसी । तैसी भिन्नत्वासी उरी नाही ॥४॥
उरी नाही कदा रामीरामदासा । स्वये होय ऐसा तोचि धन्य ॥५॥
६०८.
पुण्याचे माहेर सार्थकाचे घर । बहुतांचे छत्र स्वामी माझा ॥१॥
स्वामी माझा राम योगाचे मंडण । संसारखंडण महाभय ॥२॥
महाभय कैचे अभेद भक्तांसी । रामीरामदासी धन्य वेळा ॥३॥
६०९.
माय रघुवीर बाप रघुवीर । रुप रघुवीर सगुण पहा ॥१॥
अंत रघुवीर अनंत रघुवीर । अतीत रघुवीर बोलवेना ॥२॥
मीपण रघुवीर तूंपण रघुवीर । आपण रघुवीर वेगळाची ॥३॥
ज्ञान रघुवीर ध्यान रघुवीर । विज्ञान रघुवीर रामदासी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 26, 2011
TOP