मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग

विविध विषय - भक्तिपर अभंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


४९३ .

केला काशी विश्वेश्वर । सेतुबंध रामेश्वर ॥१॥

तरी संशय तुटेना । पूर्वगुण पालटेना ॥ध्रु०॥

भागीरथी गोदावरी । केली कृष्णा आणि कावेरी ॥२॥

राम अयोध्येचा पति । केली कृष्णा द्वारावती ॥३॥

बद्रि ओढ्याजगन्नाथ । केला स्वामी त्रिमलनाथ ॥४॥

मातापूर तुळजापूर । सप्तशृंगी कोल्हापूर ॥५॥

केली पंढरी नरहरि । शंभु पाहिला शिखरी ॥६॥

मोरेश्वर भुलेश्वर । ज्वालामुखी हरेश्वर ॥७॥

सिद्ध मैराळ मारुति । देव केले नेणो किती ॥८॥

बारा लिंगे यांवेगळी । तीर्थे केली भूमंडळी ॥९॥

रामदास म्हणे भावे । आपुले मन आटोपावे ॥१०॥

४९४ .

मुख्य पूजा परंपार । एकाहूनी एक थोर ॥१॥

आतां कोठे ठेवूं भाव । बहुसाल जाले देव ॥ध्रु०॥

माझे कुळीची दैवते । पाहो जातां असंख्याते ॥२॥

रामकृष्ण महादेव । बनशंकरी खंडेराव ॥३॥

माता सटवाई आपण । स्वामी लक्ष्मीनारायण ॥४॥

वीर बैसविला देव्हारां । माझी माता एकवीरा ॥५॥

मायराणी पांडुरंग । मुंज्या नृसिंह झोंटिंग ॥६॥

महालक्ष्मी रवळया । कुळदैवत मोरया ॥७॥

अउंदीची यमाबाई । सप्तशृंगी चंडाबाई ॥८॥

तुळजापूरची तुकाई । घाटमाथांची नवलाई ॥९॥

दंडपाणी जोगेश्वरी । माता कामाक्षी कावेरी ॥१०॥

मेसाबाई नारायण । आग्यावेताळ कारण ॥११॥

पूजा जोगिणी मांगिणी । बहुसाल मानविणी ॥१२॥

सात पांच रंगनाथ । व्यंकटेश वैजनाथ ॥१३॥

धोपेश्वर कोपेश्वर । सिद्धेश्वर सोमेश्वर ॥१४॥

अन्नपूर्णा शालिग्राम । हयग्रीव मेघश्याम ॥१५॥

परशुराम कोटेश्वर । नाना भक्ति परमेश्वर ॥१६॥

म्हेकावती भोगावती । आमच्या देव्हारांच्या संती ॥१७॥

राणादेवी नारायण । म्हैसासुर मल्लिकार्जुन ॥१८॥

अग्निसारखे दैवत । आणि मुख्य प्राणनाथ ॥१९॥

देव तांबडे अनेक । बहुसाल केले टांक ॥२०॥

तांबे दैवत नर्मदे । देवदाटले नुसदे ॥२१॥

सूर्यकांत सोमकांत । नागनाणी चक्रांकित ॥२२॥

औट मृत्तिकापूजन । नाना देवांचे लेखन ॥२३॥

डाउ पूजावे अनंत । गौरी आणि कपोईत ॥२४॥

रामदासी देव एक । येर सर्वही मायिक ॥२५॥

४९५ .

एक उपासना धरी । भक्ति भावे करी ॥१॥

तेणे संशय तुटती । पूर्वगुण पालटती ॥ध्रु०॥

सर्व नैश्वर जाणोन । वृत्ति करी उदासीन ॥२॥

सत्य वस्तूच साचार । त्याचा करावा विचार ॥३॥

त्यागोनियां अनर्गळा । सदा असावे निर्मळ ॥४॥

ध्याने आवरावे मन । आणि इंद्रियदमन ॥५॥

अखंड वाचे रामनाम । स्नान संध्या नित्यनेम ॥६॥

दास म्हणे सर्व भाव । जेथे भाव तेथे देव ॥७॥

४९६ .

कर्मे चित्तशुद्धि होऊनियां गेली । मग उपासिली उपासना ॥१॥

उपासनामिसे देव ठायी पडे । संदेहचि उडे एकसरां ॥२॥

एकसरां पंथ सापडे सुगम । जैसा विहंगम फळावरी ॥३॥

फळावरी झड जातां अनायासी । निर्फळ असोसी वायावीण ॥४॥

वायावीण शीण कासया करावा । निर्फळ जाणावा संसार हा ॥५॥

संसाराचा सोस कर्मी निजध्यास । तेणे जगदीश अंतरला ॥६॥

अंतरला देव अंतरो नेदावा । विवेक पहावा सज्जनाचा ॥७॥

सज्जनांचा योग सर्वांचा वियोग । अनित्याचा त्याग चमत्कारे ॥८॥

चमत्कारे त्याग तत्त्वविवरणे । सीघ्रचि पावणे मोक्षपद ॥९॥

मोक्षपद ज्ञाने रामदासी जाले । बंधन तुटले संसाराचे ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP