३१५ .
ऐसा कोण संत जो दावी अनंत । संदेहाचा घात करुं जाणे ॥१॥
करुं जाणे साधकांचे समाधान । जया भिन्नाभिन्न आढळेना ॥२॥
आढळेना जया आपुले पारिखे । ऐक्यरुप सुखे सुखावला ॥३॥
सुखावला ज्याचे संगती साधक । साधु तेचि एक धन्य जनी ॥४॥
धन्य तेचि जनी जे गुण बोधिले । दास म्हणे जाले पुरुष ते ॥५॥
३१६ .
नमन लंबोदरा शारदा सुंदरा । सद्गुरु माहेरा संतजना ॥१॥
संतसंगे करी निःसंग होईजे । स्वरुप पाविजे आपुलेचि ॥२॥
आपुले स्वरुप आपणा नेणवे । तयासे जाणवे राम केवी ॥३॥
राम केंवि कळे न कळे वेदासी । संगे तयापाशी पाविजेना ॥४॥
पाविजेना जंव हा देहसंबंध । राघवाचा बोध देहातीत ॥५॥
देहातीत संत जाणती अनंत । प्रकृतीचा प्रांत निजानंद ॥६॥
निजानंद पूर्वपक्षाचे बोलणे । सिद्धांतासी उणे आणियेले ॥७॥
आणियेले उणे शब्दसमुद्रासी । निःशब्दाते ग्रासी मौन्यमुद्रा ॥८॥
मौन्यमुद्रा ध्यान आसन समाधि । अविद्या उपाधी मावळली ॥९॥
मौन्यमुद्रा मावळली सर्व दासाची आशंका । जानकीनायका देखतांचि ॥१०॥
३१७ .
प्रथम नमन संत साधुजन । जया आत्मज्ञान प्रांजळीत ॥१॥
प्रांजळीत ज्ञान आत्मनिवेदन । हेंचि समाधान योगियांचे ॥२॥
योगियांचे गूज तेंचि सर्व बीज । एकचि सहज आदिअंती ॥३॥
आदिअंती सदा निर्मळ निश्चळ । जैसे ते केवळ चिदाकाश ॥४॥
चिदाकाश बाह्य अंतरी कोंदले । तैसे ते एकले सस्वरुप ॥५॥
सस्वरुपी मिथ्या मायेचे चडळ । जैसे ते आभाळ नाथिलेचि ॥६॥
नाथिलेचि दिसे साचाचियेपरी । जैसी बाजीगिरी सत्य वाटे ॥७॥
सत्य वाटे स्वप्न जैसे निजलिया । तेंचि चेइलिया मिथ्याभूत ॥८॥
मिथ्याभूत माया साच तो ईश्वर । श्रोती हा विचार विचारावा ॥९॥
विचारावा ऐसे रामदास म्हणे । सद्गुरुवचने चोजवेल ॥१०॥
३१८ .
प्रथम नमन संतसाधुजन । संवादाचे ज्ञान बोलावया ॥१॥
बोलावया सार वस्तूचा विचार । जेणे निरंतर सुख वाटे ॥२॥
सुख वाटे मनी संवाद सज्जनी । तेणे ध्यानी मनी सस्वरुप ॥३॥
सस्वरुप मने कदा आकळेना । सुल्लभ सज्जनाचेनि संगे ॥४॥
संगे साधुचिया समाधान जाले । स्वरुप लाधले रामदासी ॥५॥
३१९ .
संतांचेनि संगे देव पाठी लागे । सांडूं जातां मागे सांडवेना ॥१॥
सांडवेना देव सदा समागमी । बाह्य अंतर्यामी सारिखाचि ॥२॥
सारिखाचि कडांकपाटी शिखरी । गृही वनांतरी सारिखाचि ॥३॥
सरिखाचि तीर्थी सारिखाचि क्षेत्री । दिवा आणि रात्री सारिखाची ॥४॥
३२० .
खोटे निवडीता खरे नाणे उरे । तैसेचि विस्तारे तत्त्वज्ञान ॥१॥
तत्त्वज्ञान खोटे जाणोनि त्यागावे । मग ओळखावे प्ररब्रह्म ॥२॥
परब्रह्म खरे संतसंगे कळे । विवेके निवळे मार्ग कांही ॥३॥
मार्ग कांही कळे परीक्षा जाणतां । दिशाभुली होतां मार्ग चुके ॥४॥
मार्ग चुके मन ऐसे न करावे । सार्थक करावे दास म्हणे ॥५॥
३२१ .
भेटि देईना जनांसी । पाठी लागे सज्जनांसी ॥१॥
ऐसे प्रीतीचे लक्षण । भेटीविणे नाही क्षण ॥२॥
न ये साधनी सायासी । तो हा आम्हां अनायासी ॥३॥
रामीरामदास म्हणे । संतसंगाचेनि गुणे ॥४॥
३२२ .
जोपा केली इक्षुदंडा । तेंचि जीवन एरंडा ॥१॥
संतसंग लाधलिया । एका बोधा एका माया ॥२॥
जीवनाचे मुक्ताफळ । व्याळमुखी हळाहळ ॥३॥
रामदासी रामराव । नाही आणिक उपाव ॥४॥
३२३ .
जंव तुज आहे देहाचा संबंध । तंव नव्हे बोध राघवाचा ॥१॥
राघवाचा बोध या दहावगळा । देह कळवळा तेथे नाही ॥२॥
नाही सुखदुःख नाही येणे जाणे । चिरंजीव होणे रामरुपी ॥३॥
रामरुपी होय जन्ममृत्यु वाव । विश्रांतीचा ठाव राम एक ॥४॥
रामएकरुपी सर्वांरुपी आहे । अनुभवे पाहे आपुलिया ॥५॥
आपुल्या अंतरी बाह्य निरंतरी । सर्व सृष्टीभरी नांदतसे ॥६॥
नांदतसे सदा जवळी कळेना । कदा आकळेना ॥ साधुविण ॥७॥
साधुविण राम धांडोळितां श्रम । नव्हेचि विश्राम कांही केल्या ॥८॥
साधुविण राम कदा आकळेना । संदेह तुटेना कांही केल्या ॥९॥
संतसंगे घडे निःसंगाचा संग । राघवाचा योग रामदासी ॥१०॥