मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
गुरु-शिष्य

विविध विषय - गुरु-शिष्य

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२६१ .

वैद्य भेटला सुखदाता । रोगपालट जाला आतां ॥१॥

रस ओतीला कानांत । येउनि झोंबला नयनांत ॥२॥

रस भरला सांदोसांदी । देही पालट जाली बुद्धि ॥३॥

दिव्य देही ओतिला रस । गुरु न्याहाळी रामदास ॥४॥

२६२ .

आमुचा तो देव एक गुरुराव । द्वैताचा तो ठाव नाही जेथे ॥१॥

गुरुने व्यापिले स्थिर आणि चर । पहा निर्विकार कोंदलासे ॥२॥

रामीरामदास उभा तये ठायी । माझी रामाबाई निराकार ॥३॥

२६३ .

श्रीगुरुकृपाज्योती । नयनी प्रकाशली अवचिती ॥१॥

तेथे कापूस नाही वाती । तेलाविण राहिली ज्योती ॥२॥

नाही समई दिवेलावणे । अग्नीवीण दीप जाण ॥३॥

रामीरामदास म्हणे । अनुभवाची हे खूण ॥४॥

२६४ .

आतां ज्याचेनी दर्शने । आपणची देव होणे ॥१॥

ऐसा सद्गुरु समर्थ राव । वोळगा देवाचाही देव ॥२॥

तीन्ही देव जो विख्यात । तेही सद्गुरुचे निजभक्त ॥३॥

रामदास म्हणे शरण । जा रे चुकविला जन्ममरण ॥४॥

२६५ .

त्रिभुवनासी क्षयरोग । एक सद्गुरु आरोग्य ॥१॥

जे जे तया शरण गेले । ते ते आरोग्य होउनि ठेले ॥२॥

शरण रामीरामदास । क्षयातीत केले त्यास ॥३॥

२६६ .

देखतां सद्गुरुचे हाते ॥ देखिले तीन्ही लोकांपरते ॥१॥

ऐसा दृढ भाव धरी ॥ तरी समाधि लाहासि पुरी ॥२॥

करितां सद्गुरुसी वंदन ॥ सुख समाधिसुखाहून ॥३॥

सद्गुरुचरणतीर्थे जाणा ॥ तीर्थे न पावती पवित्रपणा ॥४॥

भलतैसे गुरुवचन ॥ परी ते वरिष्ठ वेदांहून ॥५॥

रामीरामदास म्हणे ॥ सकळ सेवा येणेगुणे ॥६॥

२६७ .

ब्रह्मांडचि तीर्थ जाले ॥ जयाचेनि एका बोले ॥१॥

सद्गुरुचे पायवणी ॥ सकळ तीर्था मुकुटमणी ॥२॥

रामीरामदास म्हणे ॥ महिमा धाता तोही नेणे ॥३॥

२६८ .

एक हे अनेक अनेक जे एक । अनुभवी देख स्वानुभव ॥१॥

कोठुनियां जाले कैसे आकारले । वेदी वर्णियले ज्ञानकांडी ॥२॥

ते गुज सद्गुरु -कृपे कळो आले । दास म्हणे जाले ब्रह्मरुप ॥३॥

२६९ .

मनोभावे नमन स्वामी सद्गुरुसी । जेणे निजसुखासी दाखविले ॥१॥

दाखविले सुख सुखरुप केले । हरुनियां नेले जीवपण ॥२॥

जीवपणा नाश जाला एकसरां । सद्गुरु सोयरा भेटतांचि ॥३॥

भेटतांचि जाले ते बोलतां नये बोले । बोलणे खुंटले वैखरीचे ॥४॥

वैखरीने कोवे वर्णू सद्गुरुसी । न कळे वेदांसी पार ज्याचा ॥५॥

ज्याचा पार नेणे सहस्त्रवदन । शिव रज -चरण माथां वंदी ॥६॥

वंदिती जयासी संत सनकादिक । मुक्तीचा दायक म्हणोनियां ॥७॥

म्हणोनियां भावे अनन्यशरण । कायावाचामने दास म्हणे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP