मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग.

विविध विषय - भक्तिपर अभंग.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


४१० .

ज्यासी जैस असे भाव । त्यासी तैसा दिसे देव ॥१॥

प्रल्हादाचिया निर्धारी । खांबी प्रगटला निर्धारी ॥२॥

रामीरामदास पिसाळले माय । म्हणौनि मोकली धाय विषयजनु ॥३॥

४११ .

स्नानसंध्या टिळेमाळा । पोटी क्रोधाचा उमाळा ॥१॥

ऐसे कैसे रे सोंवळे । शिवतां होतसे ओंवळे ॥२॥

नित्य दंडितां हा देहो । परि फिटेना संदेहो ॥३॥

बाह्य केली झळफळ । देहबुद्धीचा विटाळ ॥४॥

नित्यनेम खटाटोप । मनी विषयाचा जप ॥५॥

रामदासी दृढभाव । तेणेविण सर्व वाव ॥६॥

४१२ .

कारण पाहिजे भाव । भावेचि पाविजे देव । देवासी लाघव । कामा नये रे ॥१॥

धुरु लेंकरुं भावे । अढळ केले देवे । देखिजे स्वभावे । तारांगणी रे ॥२॥

बाळ उपमन्यी । भावचि देखिला मनी । तयासि भोजनी ॥ क्षीरसिंधु रे ॥३॥

दास म्हणे सत्य वाचा । देव हा सकळांचा । परि तो भक्तांचा । वेळाइतु रे ॥४॥

४१३ .

सकळ कळा अकळ परमात्मा श्रीहरि । तो कोणे कळे तृप्ती कीजे ॥१॥

परेहूनि तो पर्ता परेश निर्गुण । तो कोण्या शब्दज्ञाने तृप्त० ॥२॥

प्रकृतीची धातमात न चले पै तेथे । तो कोण्या धातमाते तृ० ॥३॥

स्वये सामदेव वेडावला जेथे । तो कोण्या संगीतगीते तृ० ॥४॥

सकळ नाटकपण जेथे पै आटे । तो कोण्या नटनाट्ये तृ० ॥५॥

रामदास म्हणे भावे शरण जाये । तो आपण होऊनि राहे आपणापे ॥६॥

४१४ .

भक्तीविण ज्ञान त्या नांव अज्ञान । जाणती सज्ञान संतजन ॥१॥

पायाविणे थोर केले दामोदर । पावतां संहार वेळ नाही ॥२॥

तारुविण नाव तो नव्हे उपाव । ठाकवेना ठाव पैलथडी ॥३॥

रामदास म्हणे उपासनेविण । विश्रांति पावणे घडे केवी ॥४॥

४१५ .

भावेविण भक्ति भक्तिविण मुक्ति । मुक्तीविण शांति आढळेना ॥१॥

भावे भक्ती सार भक्ती भावे सार । पावे पैलपार विश्वजन ॥२॥

भावभक्तीविण उद्धरला कोण । यालागी सगुण भक्तीभाव ॥३॥

रामदास म्हणे दक्ष ज्ञानी जाणे । भक्तीइये खुणे पावईल ॥४॥

४१६ .

त्रैलोक्याचे सार वेदां अगोचर । मथुनी साचार काढियेले ॥१॥

ते हे संतजन सांगती सज्जन । अन्यथा वचन मानूं नये ॥२॥

जे या विश्वजनां उपेगासी आले । बहुतांचे जाले समधान ॥३॥

रामीरामदासी राघवी विश्वास । तेणे गर्भवास दुरी ठेला ॥४॥

४१७ .

संगति सज्जन कथा निरुपण । सगुणे निर्गुण पाविजेते ॥१॥

सगुणाची भक्ति केल्या होते मुक्ति । ऐसे वेदश्रुति बोलतसे ॥२॥

भक्तिविण ज्ञान कदा पाविजेना । हे वाक्य सज्जनाअंतरीचे ॥३॥

रामदास म्हणे साराचेंहि सार । सर्वांसी आधार भक्तिभाव ॥४॥

४१८ .

राम म्हणती जन । ते माझे सज्जन । तेथे तन मन । विगुंतले रे ॥१॥

प्रीति सांगतां न ये । सांगावे कोणासी काय । आणिक उपाय आढळेना रे ॥२॥

चकोरा चंद्रेवीण । सांगतां वाटतो शीण । चातका जीवन । अंतराळी रे ॥३॥

राघवांचोनी ओझे । अणु हि नावडे दुजे । दास म्हणे माझे । हे जीवन रे ॥४॥

४१९ .

भक्तीची आवडी भक्तचि जाणती । जया सीतापति सानुकूळ ॥१॥

सानुकूळ देव जया दृढ भाव । भावे देवराव पाविजेतो ॥२॥

राम अभयंकरे पावले निजखूण । रुद्र बिभीषण चिरंजीवी ॥३॥

तेहतीस कोटि देवां केली आटाआटी । पावला संकटी राम माझा ॥४॥

आकाशी मंडप घातला बाणजाळी । रावण समरंगणी त्रासियेला ॥५॥

देव तो श्रीराम आमुचा मूळपुरुष । त्याचे आम्ही वंश रामदास ॥६॥

४२० .

श्रीरामपायी उद्धरली शिळा । दिव्यरुप बाळा प्रगट जाली ॥१॥

पृथ्वी भस्म करी ऐसे हळाहळ । नामे सुशीतळ केले तया ॥२॥

राम अभयंकरे पावले निजखूण । रुद्र बिभीषण चिरंजीवी ॥३॥

तेहतिस कोटि देवां केली आटाआटी । पावला संकटी राम माझा ॥४॥

आकाशी मंडप घातला बाणजाळी । रावण समरंगणी त्रासियेला ॥५॥

देव तो श्रीराम आमुचा मूळपुरुष । त्याचे आम्ही वंश रामदास ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP