३९८ .
वैराग्यापरते अनु नाही भाग्ये । धन्य ते वैराग्य ज्ञानियांसी ॥१॥
ज्ञानियांसि काय करावे वैराग्य । ज्ञानियांसि भाग्य तत्त्वबोधे ॥२॥
तत्त्वबोधे होय शब्दज्ञान सोपे । परी अनुतापे त्याग घडे ॥३॥
त्यागावे ते काय सर्व तेंचि आहे । विचारुन पाहे आलया रे ॥४॥
आलया संसारी अनुतापेविण । शब्दज्ञान शीण वाउगाचि ॥५॥
वाउगाचि बापा कासया शिणसी । जाण निश्चयेसी सर्व सार ॥६॥
सार जाणोनियां असार त्यागावे । तरीच भोगावे मुक्तिपद ॥७॥
पद ये मुक्तीचे तत्त्वज्ञाने जोडे । बोडके उघडे कासयासी ॥८॥
कासया करावे वैराग्याचे डंभ । सुखाचे स्वयंभ मोक्षपद ॥९॥
मोक्षपदी काय सांडावे मांडावे । व्यर्थचि हिंडावे वनांतरी ॥१०॥
वनांतरी हिंडे तोचि एक भला । एक तो बांधला मायाजाळी ॥११॥
मायाजाळी कैंचे कोणासी बंधन । ज्ञानी समाधान आत्मज्ञाने ॥१२॥
आत्मज्ञाने त्याग सर्वांचा करावा । मग उद्धरावा विश्वजन ॥१३॥
विश्वजनी भोग तोचि राजयोग । भोगितांचे त्याग ज्ञानियांसी ॥१४॥
ज्ञानियांसी भोग तोचि भवरोग । नव्हे राजयोग विटंबना ॥१५॥
विटंबना भ्रमे होय मूढजनां । ज्ञानी तो लिंपेना करुनीया ॥१६॥
करुनीयां काय मिथ्या शब्दज्ञान । नाही समाधान त्यागेवीण ॥१७॥
त्यागितांचि भोग भोगितांचि त्याग । ऐसा ज्ञानयोग जाण बापा ॥१८॥
जाणतील सर्व त्याग करवेना । मनी धरवेना अनुताप ॥१९॥
अनुताप आहे संतापाचे फळ । वायां तळमळ कां करावी ॥२०॥
करावी आदरे वृत्ति उदासीन । तेणे तुटे ध्यान विषयांचे ॥२१॥
विषयांचे ध्यान देहाचे जीवन । सोडी ऐसा कोण सांग बापा ॥२२॥
सांग बापा कोण विषयी तरला । कोण उद्धरला भोगितांचा ॥२३॥
भोगितांचा सर्व सज्ज्न तरले । विषय भोगिले पंचविधा ॥२४॥
पंचही विषय त्यागुनी बाधक । शुद्ध तो साधक सेविताती ॥२५॥
सेविताती सर्व त्यागी कोण आहे । विचारुनि पाहे आलया रे ॥२६॥
आलया रे त्यागी तयासि म्हणावे । जेणे हे जिणावे शिश्नोदर ॥२७॥
उदर सुटेना कामाची कल्पना । आतां त्याग हे जना कोठे आहे ॥२८॥
आहे त्याग बापा रसना जिंकावी । कल्पना मोडावी संतसंगे ॥२९॥
संतसंगे त्याग अंतरीचा होय । बाह्यात्कार काय करुनीयां ॥३०॥
करुनियां त्याग देहाचे दंडण । होतसे खंडण महादोषां ॥३१॥
महादोष कैचे संतांचे संगति । पतितांसी गति संतसंगे ॥३२॥
संतसंगे बाणे विवेक वैराग्य । योगियांचे भाग्य पाठी लागे ॥३३॥
लागतो विवेक अंतरी धरावा । संसार करावा सुखेनावे ॥३४॥
नावडे संसार दुःखाचे डोंगर । वासनाविस्तार आवरेना ॥३५॥
आवरेना तरी श्रवण करावे । परी न फिरावे दारोदारी ॥३६॥
दारोदार थोर थोर पूर्वापर । योगी ऋषीश्वर भिक्षाटणे ॥३७॥
भिक्षाटण वायां कासयां करावे । आश्रमी भजावे अतीतासी ॥३८॥
अतीतासी भजे हे कई घडावे । अश्रमी पडावे मायाजाळी ॥३९॥
मायाजाळी धर्म कांही तरी घडे । फिरे चहूंकडे उदासीन ॥४०॥
उदासीन रुप देवाचे स्वरुप । होइजे निष्पाप तयाचेनि ॥४१॥
तयाचेनि काय होणार होईल । तो काय देईल दातयासी ॥४२॥
दातयाचा दाता तो एक मागता । नेणिजे अतीता संसारी ॥४३॥
संसारी आतां सर्व कांही घडे । शिणती बापुडे उदासीन ॥४४॥
उदासीन ज्ञाता नाही पराधीन । विचारे स्वाधीन तीर्थाटण ॥४५॥
तीर्थाटण काय पाहशील मूढा । पाणी आणि धोंडा जेथे तेथे ॥४६॥
तेथे होत आहे पापाची बोहरी । केली थोराथोरी तीर्थाटणे ॥४७॥
तीर्थाटणे सदा इच्छिती साधूसी । तीर्थे साधूपाशी शुद्ध होती ॥४८॥
होती परी साधु कोणासी दिसेना । साधु तो असेना मायाधारी ॥४९॥
मायाधारी साधु जनासी दिसतो । परी जाणावा तो पद्मपत्र ॥५०॥
पद्मपत्रा ऐसे संसारी असती । हे कदा कल्पांती सत्य नव्हे ॥५१॥
सत्य नव्हे कैसे दुर्वास श्रीपती । आणि चक्रवर्ती जनक एक ॥५२॥
जनक एकला दृष्टांतासी आला । नवलाव जाला एक दोनी ॥५३॥
एकदोनी नव्हे भक्त थोर थोर । तरले संसार करुनियां ॥५४॥
करुनि संसार सुखे देशधडी । भक्तिसुखे गुढी उभारिली ॥५५॥
उभारिली गुढी संसार करितां । तया निस्पृहता कोठे होती ॥५६॥
होती निस्पृहता तेचि जाले मान्य । येर ते जघन्य लोलंगता ॥५७॥
लोलंगता नाही ऐसा कोण असे । कांही तरी असे मनामध्ये ॥५८॥
मनामध्ये वसे जैसे संसारिका । तैसा नाही लेखा तापसाचा ॥५९॥
तापसाचा वास वनामध्ये घडे । विषयांचे सडे कामबुद्धि ॥६०॥
कामबुध्दि ज्याची तया वाटे तेचि । दोषिया दोषचि दिसतसे ॥६१॥
दिसताहे तैसे बोलावे लागते । मन हे मागते विषयांसी ॥६२॥
विषयांसी मागे मन हे चंचळ । देईल तो खळ पापरुपी ॥६३॥
पापरुपी मनी परस्त्री चिंतितो । संसारी भोगितो आपुलीच ॥६४॥
आपुलेच शस्त्र उरी हाणो जातां । मरेल तत्त्वता निश्चयासी ॥६५॥
निश्चळ चळतो योगितापसांचा । मग तया कैंचा परलोक ॥६६॥
परलोकी योगी पावोनि राहिले । मिथ्या देह वाले प्रालब्धाने ॥६७॥
प्रारब्धाने देह सर्वांचा चालतो । तेथे योगिया तो सारिखाचि ॥६८॥
सारिखाचि योगी आणि संसारी । बोलतां अंतरी लाज नाही ॥६९॥
नाही तो आश्रमी साक्ष सर्व कर्मी । तया नाही ऊर्मि अज्ञानाची ॥७०॥
अज्ञानाची उर्मी लोभाचे गुंडाळे । आसक्तीच्या बळे शब्दब्रह्म ॥७१॥
ब्रह्मचि होऊनी संसारी असावे । परि न लिंपावे कर्ममेळी ॥७२॥
कर्माचा मेळावा पातकांचे फळ । तरि मायाजाळ गोड वाटे ॥७३॥
गोड वाटे जया सर्व ब्रह्म माया । जन वन तया सारिखेची ॥७४॥
सारिखेचि नव्हे सारासार आहे । अनुभवे पाहे गुरुमुखे ॥७५॥
गुरुमुखे जाले ज्याचे समाधान । त्यासी वणवण कदा नाही ॥७६॥
नाही जया आला संसाराचा वीट । तया मोक्षवाट सांपडेना ॥७७॥
सांपडेना मोक्ष जे मन चंचळ । यालागी निश्चळ मन करी ॥७८॥
करी बापा आतां संसाराची सोडी । धरुं नको गोडी आश्रमाची ॥७९॥
आश्रमाची गोडी कासया सांडावी । उपाधि मोडावी कासयासी ॥८०॥
शिकवितां नेघे तया कोण सांगे । सांगता न लागे वीतराग ॥८१॥
वीतराग ऐसे कासया म्हणावे । हे एक जाणावे निश्चयेसी ॥८२॥
निश्चयो कळला तो कदा राहेना । वैभव पाहेन कदाकाळी ॥८३॥
कदाकाळी प्राप्त भोगावे सुटेना । देहाची भावना वेगळाली ॥८४॥
वेगळाले प्राप्त तैसेचि भोगावे । परी निरोपावे वीतरागा ॥८५॥
वीतरागे देहसंबंध घडेना । वैभव सोडीना कांही केल्या ॥८६॥
केलियाने होते केलेचि पाहिजे । जे मन धरिजे तेंचि होते ॥८७॥
होतो प्रेत्न खरा प्रारब्धासारिखा । कांही पूर्वरेखा पाहिजेते ॥८८॥
पाहिजे तो यत्न आदरेंसी केला । मग प्राप्तव्याला शब्द घडे ॥८९॥
घडे तो प्रयत्न होणारासारखा । नाही तरि देखा आठवेना ॥९०॥
आठवेना तरी आलस्य नसावा । आलस्याचा हेवा करुं नये ॥९१॥
करुं नये ऐसे बोलणे बोलावे । होणार स्वभावे होत जाते ॥९२॥
होत जात परी प्रेत्नेविण नाही । आधी प्रेत्न कांही पाहिजेतो ॥९३॥
पाहिजेतो परी घडोनी येईना । मनाची वासना पूर्ण नव्हे ॥९४॥
नव्हे समाधान साधनावांचूनि । वाया शब्दज्ञान वाउगेचि ॥९५॥
वाउगे साधन कासया करावे । स्वरुप स्वभावे सिद्ध आहे ॥९६॥
सिद्ध आहे तरी अंतरी बाणेना । संशयो जाणेना निश्चयेसी ॥९७॥
निश्चयाचे ज्ञान विवेक संपन्न । तया हे अज्ञान बाधी केवी ॥९८॥
केवी बाधिजेना आसक्तीच्यामुळे । मायाजाळ काळे ओढियेले ॥९९॥
ओढियेले काळे अभक्त नरासी । नाही तयापाशी भक्तिभाव ॥१००॥
भक्तिभाव क्रिया मोक्षाचे साधन । वीतरागी मन सर्वकाळ ॥१०१॥
सर्वकाळ जेथे कथानिरुपण । श्रवण मनन निजध्यास ॥१०२॥
निजध्यास मन वृत्ति उदासीन । नावडे कांचन आणि कांता ॥१०३॥
कांता पुत्र धन वैभव स्वजन । रामेविण आन आवडेना ॥१०४॥
आवडेना भार नाथिला संसार । रामदासी सार रामदास्य ॥१०५॥