मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


७०१.
देव पाषाण भाविला । तोचि अंतरी दाविला ॥१॥
जैसा भाव असे जेथे । तैसा देव वसे तेथे ॥२॥
दृश्य बांधोनियां गळां । देव जाहला निराळा ॥३॥
दास म्हणे भावातीत । होतां प्रगटे अनंत ॥४॥

७०२.
जाला स्वरुपी निश्चय । तरि कां वाटतसे भय ॥१॥
ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणां आपण ॥ध्रु०॥
क्षण एक मी निरास । क्षणे म्हणे मी मनुष्य ॥२॥
रामीरामदास म्हणे । देहबुद्धीचेनि गुणे ॥३॥

७०३.
तंवरी रे तंवरी भवगजाचे भान ।
जव सद्गुरुपंचानन । देखिला नाही ॥१॥
तंवरी रे तंवरी मायावन प्रबळ ।
जंव ज्ञानवडवानळ पेटला नाही ॥२॥
तंवरी रे तंवरी विषयसुखद्योत ।
जंव निजबोधगभस्त देखिला नाही ॥३॥
तंवरी रे तंवरी जन्ममरणदुःख ।
जंव सद्गुरुवचनपीयूष घेतले नाही ॥४॥
तंवरी रे तंवरी मानसमृगतृष्णा ।
जंव स्वानंदपूर्ण कृष्णा देखिली नाही ॥५॥
रामदास म्हणे हे अवघी बुचबंगाळी ।
ऐसा थोडा बळी जो देहबुद्धि सांडी ॥६॥

७०४.
तंवरी रे तंवरी वैराग्याचे ठाण ।
जंव कामिनीकटाक्षबाणे भेदिले नाही ॥१॥  
तंवरी रे तंवरी सदृढता भक्तीची ।
जंव चाली विकल्पाची जाली नाही ॥२॥
तंवरि रे तंवरि शब्दज्ञानबोध ।
जंव तो नैश्वर क्रोध पातला नाही ॥३॥
तंवरि रे तंवरि सकळहि बाधक ।
जंव तो रघुनायक कृपा न करी ॥४॥
रामीरामदासी भेटला सद्गुरुराव ।
सकळ भावाभाव सुखरुप जाले ॥५॥

७०५.
तंवरि रे तंवरी परमार्थ स्वयंभ ।
जव पोटागीवरी लोभ आला नाही ॥१॥
तंवरी रे तंवरी डगमगीना कदा ।
जंव देहासी आपदा जाल्या नाही ॥२॥
तंवरी रे तंवरी अत्यंत सद्भाव ।
जंव ते निःशेष वैभव आले नाही ॥३॥
तंवरी रे तंवरी धीरत्वाची मात ।
जंव प्रपंची आघात जाला नाही ॥४॥
तंवरी रे तंवरी दावी निराभिमान ।
जंव देहासी अपमान जाला नाही ॥५॥
रामदास म्हणे आवघी बुचबंगाळी ।
ऐसा थोडा बळी जो देहबुद्धि सोडी ॥६॥

७०६.
तंवरी रे तंवरी न घडे अवज्ञा ।
जंव ते कांही आज्ञा केली नाही ॥१॥
तंवरी रे तंवरी कडकडीत वैरागी ।
जंव ते पोटी भडागी जाली नाही ॥२॥
तंवरी रे तंवरी ज्ञान ते सांगावे ।
जंव ते मागावे अर्थ कांही ॥३॥
तंवरी रे तंवरी शब्दज्ञानसुख ।
जंव ते संसारीचे दुःख जाले नाही ॥४॥
तंवरी रे तंवरी निर्भयाच्या गोष्टी ।
जंव भेणे पाय पोटी गेले नाही ॥५॥
रामदास म्हणे हे तंवरीच कठिण ।
जंव ते पूर्ण समाधान जाले नाही ॥६॥

७०७.
एक लाभ सीतापती । दुजी संताची संगती ॥१॥
लाभ नाही यावेगळा । थोर भक्तीचा सोहळा ॥२॥
हरिकथा निरुपण । सदा श्रवणमनन ॥३॥
दानधर्म  आहे सार । दास म्हणे परोपकार ॥४॥

७०८.
ऐसे कैसे रे भजन । करिताती मूर्ख जन ॥१॥
गधड्यास नमन केले । तेणे थोबाड फोडिले ॥२॥
कुतर्‍यास पुंजू गेला । तेणे तेथेचि फाडिला ॥३॥
उंचनीच सारिखेचि । दास म्हणे होते ची ची ॥४॥

७०९.
जो कां भगवंताचा दास । त्याने असावे उदास ॥१॥
जे कां देतिल तेंचि घ्यावे । कोणा कांही न मागावे ॥२॥
सदा श्रवणमनन । आणि इंद्रियदमन ॥३॥
नानापरी बोधुनि जीवा । आपुला परमार्थ करावा ॥४॥
आशा कोणाची न करावी । बुध्दि भगवंती लावावी ॥५॥
रामदासी पूर्णकाम । बुद्धि दिली हे श्रीरामे ॥६॥

७१०.
काळ काळा की पिंवळा । काळा निळा की सांवळा ।
काळ दुरी की जवळा । कैसा आहे ॥१॥
काळ उंच की ठेंगणा । काळ वेड की शाहणा ।
काळ कैसा आहे जाणा । प्रचीतीने ॥२॥
काळ मायेमध्ये आला । की तो निराळा राहिला ।
याचा प्रत्ययो पाहिला । म्हणजे बरे ॥३॥
कालज्ञान तालज्ञान । तत्त्वज्ञान पिंडज्ञान ।
साधुमुखे समाधान बरे पहा ॥४॥
दास मौजेने बोलिला । कीं तो उगाच चावळला ।
चित्त द्यावे त्याचे बोला । श्रोतेजनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP