२७३ .
संसार करितां होय सायुज्यता । ऐसे कांही आतां सांगा स्वामी ॥१॥
सांगा स्वामी कोण स्थिति जनकाची । राज्य करितांचि मुक्त कैसा ॥२॥
मुक्त कैसा होता देहींच विदेही । कैसा लिप्त नाही करोनियां ॥३॥
करुनियां सर्व आपण वेगळा । सांगा तेचि कळा आम्हालागी ॥४॥
आम्हांलागी सांगा त्याचे समाधान । रामदास खुण पुसतसे ॥५॥
पुसतसे आतां पाहिजे बोलिले । कैसे राज्य केले विदेहाने ॥६॥
विदेहाने सत्य स्वामीचे वचन । तेथे विश्वासोन वर्ततसे ॥७॥
वर्ततसे जनी अहंता सांडुनी । आदीकारणी प्रकृती हे ॥८॥
प्रकृतीचा प्रांत आद्य मध्य अंत । तेंचि तें निवांत रुप तुझे ॥९॥
रुप तुझे सदा सर्वत्र संचले । वेदांचेनि बोले महावाक्य ॥१०॥
महावाक्य ते तूं स्वरुप आहेसी । जाण निश्चयेसी आपणासी ॥११॥
आपणा पहातां जाली तन्मयता । सोहं हे तत्वतां मनी धरी ॥१२॥
मनी धरी सोहं आत्मा हे वचन । तेणे समाधान पावशील ॥१३॥
पावशील निजस्वरुप आपुले । जरी विश्वासले मन तेथे ॥१४॥
मन तेथे जाय वचनासरिसे । तंव मनी नसे मनपण ॥१५॥
मनपण गेले स्वरुप पाहतां । तैसेचि राहातां समाधान ॥१६॥
समाधान बाणे त्यागितां संगासी । जनके शुकासी सांगितले ॥१७॥
सांगितले संगं त्यक्त्वा सुखी भव । मग अनुभव शुक पाहे ॥१८॥
शुक पाहे संग काय म्यां धरिला । विवरो लागला सस्वरुपी ॥१९॥
सस्वरुपी शुक नामरुप नाही । जनक विदेही आढळेना ॥२०॥
आढळेना तुटी तेथे कैंची भेटी । आठवण पोटी स्वरुपाची ॥२१॥
स्वरुपी आठवी आपुला विसरु । शुक योगेश्वरु संगातीत ॥२२॥
संगातीत जाला निःसंगा पाहातां । येणे रीती आतां समाधान ॥२३॥
समाधान बाणे सज्जन संगती । तिन्हीही प्रचीती ऐक्यरुप ॥२४॥
ऐक्यरुप वेद स्वामीचे वचन । आपुलेही मन सत्य मानी ॥२५॥
सत्य मानी ब्रह्म येर सर्व भ्रम । अहंतेची सीमा ओलांडिली ॥२६॥
ओलांडिली सीमा देहसंबंधाची । जाले असतांचि स्वप्न जैसे ॥२७॥
स्वप्न जैसे मनी जागृति आठवे । परी ते जाणावे मिथ्याभूत ॥२८॥
मिथ्याभूत माया सद्गुरुवचने । देहप्रारब्धाने वर्ततसे ॥२९॥
वर्ततसे परी देह तूं नव्हेसी । विश्वास विश्वास मानसी दृढ धरी ॥३०॥
दृढ धरी अहं ब्रह्म ऐसी खूण । देहाचे कारण प्रकृतीचे ॥३१॥
प्रकृतीचे रुप नव्हे तूं स्वरुप । पुण्य आणि पाप देहसंगे ॥३२॥
देहसंग बापा निःसंगासी कैंचा । वृत्ती निवृत्तीचा शून्याकार ॥३३॥
शून्याकार देहो कायसा संदेहो । वृत्तीशून्य पाहो संतजन ॥३४॥
संतजन तेणे सुखे सुखावले । तेंचि हे बोलिले ओंवीमिसे ॥३५॥
ओवींमिसे गुप्त पंथ हा सांपडे । गुजठायी पडे योगियांचे ॥३६॥
योगियांचे गुज योगीच जाणती । जेथे नेति नेति वेद बोले ॥३७॥
वेद बोलियेला त्रिविध वचन । कर्म उपासना आणि ज्ञान ॥३८॥
ज्ञानाचा निश्चयो बोलिला वेदांती । आणि शास्त्रमती बहुसाल ॥३९॥
बहुसाल शास्त्रे पाहतां सरेना । आयुष्य समाधान ॥४०॥
जन्मवरी वांया संदेही पडावे । केधवां घडावे समाधान ॥४१॥
समाधान घडे साधूचे संगती । गीता भागवती हेचि आहे ॥४२॥
हेंचि आहे सार जाणावे साचार । करावा विचार शाश्वताचा ॥४३॥
शाश्वताचा भाव सर्व ठायी पडे । जरी भावे घडे संतसंग ॥४४॥
संगसंगे देव पाविजे तत्वतां । शास्त्रे धांडोळितां आडळेना ॥४५॥
आढळेना जनी दिसेना लोचनी । ते या साधूंचेनि पावीजे ते ॥४६॥
पाविजे ते निजस्वरुप आपुले । मन भांबावले जये ठायी ॥४७॥
जये ठायी तुटे सर्वही आशंका । तेंचि लाभे एका गुरुमुखे ॥४८॥
गुरुमुखे सत्य मानावे अंतरी । वेगी सोय धरी आलया रे ॥४९॥
आलया रे संग साधूचा धरावा । संसार तरावा साधुसंगे ॥५०॥
साधुसंगे ज्ञान रामदासी जाले । शरीर लागले भक्तिमार्गे ॥५१॥