५३१ .
लाज हे पापिणी लागलीसे पाठी । तेणे नव्हे भेटी राघवाची ॥१॥
राघवाची भेटि तरीच लाहिजे । कीर्तनी राहिजे क्षण एक ॥२॥
अर्थारुढ मन श्रवण मनन । होय समाधान निजध्यास ॥३॥
रामीरामदास कथेची आवडी । लागलीसे मान्य हरिभक्ति ॥४॥
५३२ .
कथानिरुपणे समाधि लागली । वासना त्यागिली अंतरींची ॥१॥
नाही आपपर कीर्तनी तत्पर । मनी सारासार विचारणा ॥२॥
अर्थारुढ मन श्रवण मनन । होय समाधान निजध्यास ॥३॥
रामीरामदास कथेची आवडी । लागलीसे गोडी नीच नवी ॥४॥
५३३ .
राघवाची कथा पतितपावन । गाती भक्तजन आवडीने ॥१॥
राघवाच्या गुणा न दिसे तुळणा । कैलासीचा राणा लांचावला ॥२॥
देवांचे मंडण भक्तांचे भूषण । धर्मसंरक्षण राम एक ॥३॥
रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणे । कथानिरुपणे जन्म गेला ॥४॥
५३४ .
टाळ धरुं कथा करुं । रामालागी हाका मारुं ॥१॥
ये रे रामा ये रे रामा । तुझी आवडी लागो आम्हां ॥२॥
तुजविण गाईल कोण । उठ सांडी मीतूंपण ॥३॥
रामदास पाहे वास । भेटी द्यावी सावकाश ॥४॥
५३५ .
टाळ वाजे मंद मंद । मुखी हरिनामाचा छंद ॥ध्रु०॥
फडके ताळी एक वेळां । घोष नामाचा आगळा ॥१॥
रंगी हरिदास मातले । नामघोषे आनंदले ॥२॥
उभे हरिदास रंगणी । रामदास लोटांगणी ॥३॥
५३६ .
नसे वैकुंठीचे ठायी । नसे योग्याचे हृदयी ॥१॥
माझे भक्त गाती जेथे । नारदा मी उभा तेथे ॥२॥
ब्रह्मादिकांसी नातुडे । तो मी कीर्तनी सांपडे ॥३॥
रामदास म्हणे साचे । वाक्ये आहे भगवंताचे ॥४॥
५३७ .
काय गावे रे काय गावे । आम्हां नाही सर्व ठावे ॥१॥
बोधमृदंग फुटका । टाळ द्वैताचा तुटका ॥२॥
दास वेडे रे बागडे । नृत्य करी करिती देवापुढे ॥३॥
रामभेटीचा समय । रामदासी गातां नये ॥४॥
५३८ .
त्याचे पाय हो नमावे । त्याचे कीर्तन हो ऐकावे ॥१॥
दुजियासी सांगे कथा । आपण वर्ते त्याचि पथा ॥२॥
कीर्तनाचे न करी मोल । जैसे अमृताचे बोल ॥३॥
सन्मानितां नाही सुख । अपमानितां नाही दुःख ॥४॥
किंचित दिले दातयाने । तेंहि घेत आनंदाने ॥५॥
ऐसा तोचि हरिदास । लटके न वदे रामदास ॥६॥
५३९ .
सीतापति राम पतितपावन । गाती भक्तजन आवडीने ॥१॥
राघवाच्या गुणा न दिसे तुळणा । कैलासीचा राणा लांचावला ॥२॥
देवांचे मंडण भक्तांचे भूषण । धर्मसंरक्षण राम एक ॥३॥
रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे । कथानिरुपणे जन्म गेला ॥४॥
५४० .
राम गावा राम ध्यावा । राम जीवींचा विसावा ॥१॥
कल्याणाचे जे कल्याण । रघुरायाचे गुणगान ॥२॥
मंगळाचे जे मंगळ । राम कौसल्येचा बाळ ॥३॥
राम कैवल्याचा दानी । रामदासा अभिमानी ॥४॥
५४१ .
ध्यान विषयांचे तुटावे । म्हणोनि हरिकथेसि जावे ॥१॥
ऐसी हेचि कथा गोवी । तरि ते धांवणे नागवी ॥२॥
विषयासी कंटाळलो । म्हणुनि हरिकथेसी जावे ॥३॥
विषयध्यान सोडावया । आलो किर्तनाच्या ठायां ॥४॥
काम क्रोध मजपाशी । म्हणुनि आलो हरिकथेसी ॥५॥
रामीरामदास म्हणे । वाद सांडुनियां देणे ॥६॥
५४२ .
हरिकथा निरुपणे । तेणे लागली भांडणे ॥१॥
अमृताचे विष जाले । हे तो प्रचीतीस आले ॥२॥
चिंतामणि चिंता करी । परिस जाहला भिकारी ॥३॥
आनंदे दुःखवीले । कामधेनूने डाविले ॥४॥
कल्पतरुचा फणसा । एकाएकी भरला कैसा ॥५॥
रामीरामदास म्हणे । हानि जाली निरुपणे ॥६॥